पुढारी ऑनलाईन डेस्क : चांदिवाल आयोगाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळात आला होता. पण फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडले. त्यानंतर महायुती सरकारने अद्याप तो अहवाल पुढे आणला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून खोट बोलत आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. नागपूर येथे आज (दि. ५) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या १४०० पानांचा चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारने दडपून ठेवला, असा आरोप करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. यावर तो अहवाल हा महाविकास आघाडीच्याच काळात राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. त्याचवेळी तो जाहीर का करण्यात आला नाही? असा प्रतिसवाल फडणवीस यांनी केला होता. यावर आज अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, फडणवीसांनी ठाकरेंच्या आमदारांना ५० कोटी देऊन सरकार पाडलं. ठाकरे सरकार पडल्यामुळे चांदिवाल आयोगाच अहवाल पुढे आणता आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याऐवजी स्वतः नार्को टेस्टला तयार असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.