किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतूक 
सिंधुदुर्ग

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

मालवण : नव्या पर्यटन हंगामात येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी प्रवासी होडी वाहतूक सेवेस सोमवारपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी परिसरात 25 मे ला पर्यटन हंगामाची सांगता झाली होती. गेले तीन महिने बंद असलेले किनारपट्टी भागातील पर्यटन आता सुरू होत असून पर्यटन व्यवसायिकही सज्ज झाले आहेत. 1 सप्टेंबर पासून पर्यटन हंगामास सुरवात होते. मात्र समुद्रातील वार्‍याचा वेग व पाऊस यामुळे यावेळी उशिराने हंगामाची सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमानी तसेच राज्याच्या विविध भागातून पर्यटकही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गला भेट देता यावी, यासाठी सोमवार पासून किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे.

मार्च 2024 मध्ये संपलेले परवाना नूतनीकरण करण्यासाठी बंदर कार्यालयाकडून लागणार्‍या कागदपत्रांमध्ये नौकांचा सर्वे अनिवार्य आहे. या सर्वेची फी किल्ला होडी वाहतूक संघटनेच्या सदस्यांनी एप्रिल महिन्यात ऑनलाईन पद्धतीने भरलेली आहे. याची दखल घेत बंदर विभागाने सर्वे बोलावणे आवश्यक होते. मात्र बंदर कार्यालयाकडून अशा प्रकारची कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही येत्या महिन्याभरात सर्व नौका पाण्यात उतरवल्यावर नौकांचा सर्वे आमच्या स्वखर्चाने करून घेऊ. त्या अनुषंगाने आम्ही या हंगामास सुरुवात करत असल्याचे पत्र सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने बंदर निरीक्षकांना सादर करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र वेंगुर्ले येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रादेशिक बंदर अधिकार्‍यांनाही सादर करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT