देखभाल दुरुस्तीपेक्षा नवीन कामांवरच भर
बहुतांशी वीज वाहिन्या झाल्यात जीर्ण
ट्री कटिंगची कामे वेळीच न झाल्याचा फटका
अनियमित वीज पुरवठ्याने मूर्तिकारांसह जनता हैराण
अजित सावंत
कणकवली : सिंधुदुर्गात गेले दोन महिने सातत्याने खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला. याबाबत वेळोवेळी झालेल्या आंदोलनानंतर महावितरणने ट्री कटिंग व अन्य दुरुस्तीची कामे हाती घेवून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटवले असले तरी अद्यापही ग्रामीण भागात दिवसा आणि रात्रीही बर्याचवेळा बत्ती गुल होत आहे. विशेषत: गणेश मूर्तिकारांना याचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या वीस वर्षांत महावितरणने सिंधुदुर्गात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अर्थात पायाभूत सुधारणा योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र तरीही सिंधुदुर्गची वीज यंत्रणा डळमळीतच असून ती सक्षम करण्याची गरज आहे. एकीकडे स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ झाल्याने जनतेत संताप व्यक्त होत असतानाच वीज पुरवठाही अखंडित नसल्याने ग्राहकांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
मात्र, यंदा कधी नव्हे एवढा वीज पुरवठा पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच खंडित होण्यास सुरुवात झाली. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत पावसाळ्याच्या प्रारंभी वादळ झाले नाही. मात्र तरीही गेले दोन महिने दिवसातून अनेकदा आणि रात्रीही वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण बेसुमार वाढले होते. जूनपासून जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तर असा एकही दिवस गेला नाही की वीज खंडित झाली नाही. विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते.
खरेतर पावसाळ्याअगोदर मे महिन्यात वीज वाहिन्यांवरील झाडे तोडण्याची कामे ज्या गतीने व्हायला हवी होती ती झाली नाहीत. शिवाय जिल्ह्याच्या अनेक भागातील वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात 1970 ते 80 च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाकडून गावोगावी वीज पुरवठा करण्यात आला. त्याला आता जवळपास 40 ते 45 वषार्ंहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या वीस वर्षात सिंधुदुर्गात कोट्यवधी रुपये खर्च करून पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली. परंतु जुन्या कामांच्या देखभाल दुरुस्तीपेक्षा नवीन कामेच अधिक प्रमाणात झाली.
महावितरणने मोठमोठ्या कंपन्यांना पायाभूत सुविधांची कामे दिली; परंतु ती कामे कितपत दर्जेदार झाली हे देखील पाहणे आवश्यक होते. पूर्वी सर्व वीज वाहिन्या अॅल्युमिनीयमच्या होत्या, त्यामुळे त्यांनी 40 वर्षे हा भार सोसला. आता मात्र या जीर्ण झालेल्या वाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी त्या तुटतात त्या ठिकाणी जॉईंट मारून काम चालवले जाते, त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होतो आणि वीज हानीही होते. अनेक वेळा निष्पाप जीवांचे बळी गेल्याची उदाहरणेही तुटलेल्या तारांमुळे जिल्ह्यात आहेत.
पूर्वी लाईनला जवळजवळ सेक्शन पॉईंट (फ्यूज) होते, मात्र अलीकडच्या काळात ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी फ्यूज बसवले जातात. जर टप्प्याटप्यावर फ्यूज असते तर या दुर्घटना टाळता येतील. तारा तुटण्याच्या वाढत्या घटनांमुळे महावितरणने वीज वाहिन्यांना स्पेसर बसविले आहेत. मात्र, दोन वाहिन्यांमधील अंतर जास्त असल्याने त्या स्पेसरच्या वजनाने काही ठिकाणी लाईन खाली आल्या आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागातही जिल्ह्यात गणेशमूर्ती साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मूर्तींचे रंगकाम व अन्य कामेही विजेवरच अवलंबून असल्याने वारंवार खंडित होणार्या विजेमुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला होता.
वारंवार होणार्या खंडित वीज पुरवठ्याबाबत महावितरणचे कणकवली विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जुलैच्या तिसर्या आठवड्यापर्यंत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते; मात्र गेल्या तीन आठवड्यात महावितरणने ट्री कटिंग मोहीम व्यापक स्वरूपात राबवल्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसात 90 टक्क्यापर्यंत कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तारांवरील झाडांच्या फांद्या न तोडल्याचा फटका यंदा महावितरणला बसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र आता बर्यापैकी वीज वाहिन्यांवरील अडथळे दूर झाले आहेत. येत्या गणेशोत्सवात वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणने आवश्यकत्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. लाईन कट पॉईंटमधील जम्प बदलले जात असून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच लाईन देखभाल दुरूस्तीसाठी नियमित कर्मचार्यांबरोबरच आऊटसोर्समधील विशेष मनुष्यबळही तैनात ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.