माजी आ. वैभव नाईक (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhuduratna Yojana | हिंमत असेल तर ‘सिंधुरत्न’ योजना सुरू करून दाखवा!

ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांचे केसरकर, राणेंना आव्हान; अजित पवार सुरुवातीपासूनच योजनेच्या विरोधात असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : खा. नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे हे अर्थमंत्री अजित पवारांसमोर परखडपणे बोलू शकत नाहीत, म्हणूनच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेली सिंधुरत्न योजना बंद झाली आहे. राणे, केसरकर यांनी हिंमत असेल तर अजित पवार यांच्यासमोर बसून सिंधुरत्न योजना सुरु करून दाखवावी आणि जुलैच्या पावसाळी अधिवेशनात सिंधुरत्न योजनेसाठी पैसे मंजूर करून दाखवावेत, असे आव्हान ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी दिले.

माध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ देण्यासाठी जिल्हाधिकारी मुदतवाढीचा प्रस्ताव सचिवांकडे पाठवत असतील तर जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी झोपले आहेत का? असा सवाल करत सिंधुरत्न योजना बंद झाल्यामुळे प्रतिक्रिया देताना वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले 2014 साली शिवसेना-भाजप महायुती सरकार स्थापन झाल्यांनतर दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने विनायक राऊत आणि मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन योजना सुरू करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून ‘चांदा ते बांदा’ योजना मंजूर करून घेतली. मात्र 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा अर्थमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी ही योजना बंद केली.

त्यामुळे विनायक राऊत आणि मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ‘चांदा ते बांदा’ सारखी योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यावर सिंधुरत्न योजना सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले व त्यासंदर्भात बैठक घेण्यात आली, तेव्हा अजित पवार यांनी या योजनेला देखील विरोध केला होता. त्यावेळी मी बैठकीत अजित पवार यांना उद्देशून तुम्ही सर्व बारामतीत नेता तेव्हा चालते आणि आमच्या जिल्ह्याला काही मिळत असेल तर विरोध कशाला करता, असे परखड मत मांडले होते. याला दीपक केसरकर, उदय सामंत सुद्धा साक्षीदार आहेत. त्यामुळे आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून आणि सुदैवाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी अजित पवार यांचा विरोध डावलून सिंधुरत्न योजना राबविण्याचे आदेश दिले.

त्यावेळी 300 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते. त्यातून वीज संबंधित विविध कामे, होम-स्टे व पर्यटन विकासात्मक कामे, दशावतारी कलाकारांसाठी योजना तसेच मच्छीमारांच्या बोटींसाठी इंजिन, महिला मच्छीमारांना गाड्या, मच्छीमारांना इन्सुलिटेड वाहने देण्यात आली. त्यावेळी खा. नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत ही योजना बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते, मात्र ही योजना चांगली असल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नेते ही योजना आपण आणल्याचे जाहीर करत होते. तरही महायुती सरकारने ही ‘सिंधुरत्न’ योजना बंद केली आहे. आतापर्यंत हजारो अर्ज या योजनेअंतर्गत दाखल झाले आहेत.

अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचे काय होणार? यावर महायुतीचे नेते बोलत नाहीत. त्यामुळे महायुतीच्या मंत्री आणि लोकप्रतिनीधींनी तुमच्यात जर हिंमत असेल तर ही योजना पुन्हा सुरू करून दाखवावी, असे आव्हान वैभव नाईक यांनी दिले.

अजित पवारांसमोर तुम्ही परखड बोलू शकत नाही म्हणून...

केवळ एखादे विकास काम करायचे आणि त्यांच्या टेंडरमध्ये अधिकार्‍यांशी संगनमत करून पैसे काढायचे काम करू नका. तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करता म्हणून सांगता, परंतु अजित पवारांसमोर तुम्ही परखडपणे बोलू शकत नाही, म्हणूनच ही योजना बंद झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचे श्रेय घेण्यासाठी धावत होते, ते आज कुठे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना जर मतदारांना, जनतेला तोंड दाखवायचे असेल तर सिंधुरत्न योजना सुरु करून दाखवा. विरोधी पक्षाने सत्ताधार्‍यांच्या विरोधात भूमिका मांडली तर आमच्या घरावर येण्याचे आव्हान खा. राणे देतात. त्यामुळे सिंधुरत्न योजनेत अर्ज केलेल्या लोकांनीच याविरोधात आवाज उठविला पाहिजे, असे माजी आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT