

ओरोस : आज धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे. योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते. म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त शनिवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य रवींद्र खेबुडकर, अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिंधुदुर्ग मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.कृपा गावडे, ‘माय भारत’च्या जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, डॉन बॉस्को, न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, आणि एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांची जीवनशैली बदललेली आहे. सहाजिकच प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी सर्वांनी नियमित योगा, व्यायाम करावा. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते.यावर्षीच्या योग दिनाचे ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग’ हे घोषवाक्य आहे.
केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या Common Yoga Protocol नुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करुन घेण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उपस्थित अधिकारी-कर्मचार्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.