कुडाळ : माणगांव खोऱ्यातील वसोली कुत्रेकोंड कॉजवेवरून अमित नामक मोटरसायकल स्वार वाहुन गेला तर त्यांच्या सोबत असलेला कानडे नामक दुसरा सहकारी सुदैवाने बचावला.ही घटना सोमवारी सायंकाळी ८.३० वा.च्या सुमारास घडली. याबाबतची माहिती आपत्कालीन यंत्रणेला देण्यात आली आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात गेला आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यातच सह्याद्री पट्ट्यात काही प्रमाणात पावसाचा जोर अधिक आहे ; त्यामुळे कर्ली नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाली आहे.सोमवारी सकाळपासून माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा वाढला होता, त्यामुळे वसोली कुत्रेकोंड कॉजवेंवर पाणी आले होते.त्याच दरम्यान माणगांव येथून मोटरसायकलने दोन युवक शिवापूरला जात होते.
त्यांची मोटरसायकल वसोली कुत्रेकोंड येथे आली असता त्यांनी कॉजेवरील पाण्याचा अंदाज न घेता कॉजवेवरील पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला मात्र कॉजवे वरील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे मोटरसायकल पाण्याच्या प्रवाहाने खाली खेचली गेली. त्यात अमित नामक युवक पुलाच्या खाली पडला व वाहून गेला, त्याच्यासोबत बसलेला त्याचा सहकारी सुदैवाने बचावला. त्याने घटनास्थळी आरडाओरड केली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्याही परिस्थितीत कानडे नामक सहकाऱ्याने लगत असलेल्या वसोली येथील एका दुकानावर धाव घेत झालेला घटनाक्रम ग्रामस्थांना आहे सांगितला.त्यानंतर सर्वत्र फोनाफोनी व धावाधाव सुरू झाली आहे पण रात्रीची वेळ असल्यामुळे सर्वच यंत्रणांना मर्यादा आहेत.