कुडाळ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानांतर्गत सेलिब्रिटी गाव भेट कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील अणाव गावात रविवारी सकाळी दाखल ‘महाराष्ट्राची हास्य जत्राट फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांचे अणाववासीयांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी लोकसहभागातून स्वागत मिरवणूक, दिंडी तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम ग्रामस्थांचा उत्साह, आनंद आणि लोकसहभागाने अधिक रंगून गेला. या अभियानात अणाव गावात राज्यात अव्वल क्रमांकावर राहण्यासाठी सर्वांनी यशस्वीपणे काम करा, असे आवाहन दोन्ही सेलिब्रिटींनी अणाववासीयांना केले. तर शासनाच्या प्रत्येक योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून, या समृद्ध पंचायतराज अभियानातही हा जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहील, असा ठाम विश्वास जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी व्यक्त करीत अभियानात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी गाव भेटीसाठी शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली. यात कुडाळ तालुक्यातील अणाव व आंदुर्ले, सावंतवाडी मधील व्येत्ये आणि कणकवलीतील कलमठ व लोरे नं. 1 या गावांचा समावेश आहे. अणावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू -रामेश्वर मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मंदीर जवळ मुख्य कार्यक्रमाचा दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाला.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अभिनेते पृथ्वीक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, जि.प. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर, निवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, सामाजिक कार्यकर्ते संदीप परब, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष विनायक अणावकर, पोलिस पाटील सुनील पाटकर, माजी उपसभापती जयभारत पालव आदींसह अधिकारी, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
खेबुडकर म्हणाले, समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरूवात सप्टेंबर महिन्यात झाली आहे. जिल्ह्यातील गावागावात या अभियानांतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्वाधिक तीनशे ग्रामपंचायती शासन वेबसाईटला जोडण्यात आल्या. विकास कामांची भूमीपुजन, उद्घाटने करण्यात आली. अनेकांनी नियुक्ती पत्र देण्यात आली. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी 2 लाख 20 हजारांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 2900 घरांना चाव्या प्रदान करण्यात आल्या. एकाच वेळेस 2900 घरांना चाव्या प्रदान करण्याचा हा राज्यातील विक्रम सिंधुदुर्ग जि.प.ने केला आहे. हा जिल्हा पंतप्रधान आवास योजनेत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील जवळपास 62 टक्के नागरीकांची आयुष्यमान कार्ड काढण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसात या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी केली जाणार असून या कामातही हा जिल्हा राज्यात अव्वल आहे. प्रत्येक योजनेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. कोणतीही योजना असो यात सिंधुदुर्ग जि.प. राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.
अणाव गाव राज्यात अव्वल राहील - अभिनेते पृथ्वीक प्रताप
अभिनेते पृथ्वीक प्रताप म्हणाले, कोकणात यायला नेहमीच खूप छान वाटत. ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून अणाव गाव या अभियानांतर्गत मॉडेल गाव ठरले. राज्य शासनाच्या विविध सुंदर योजना आहेत. त्यात या समृद्ध पंचायतराज अभियान या नाविन्यपूर्ण योजनेची भर पडली आहे. अणाव ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत आहे. या अभियानांतर्गत पारितोषिक मिळविण्यात राज्यात अणाव ग्रामपंचायत अव्वल क्रमांकावर राहिल, असा विश्वास व्यक्त करत, सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाने गावाला व्यासपीठ मिळवून दिले ः सरपंच लिलाधर अणावकर
सरपंच लिलाधर अणावकर यांनी या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने गावात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला या अभियानात सात घटकांवर आधारित गावात सर्व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. लेक लाडकी योजना, सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे पुरविणे, डिजिटल शाळा, पेशंट बँक, कापडी पिशव्या वाटप, ई ग्रंथालय, बचत गटांना व्यासपीठ मिळवून देणे, ग्रामपंचायतीची वेबसाईट लोकार्पण असे अनेक उपक्रम आम्ही राबवित आहोत.
संजय गोसावी (पणदूर) यांनी समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. मान्यवरांच्या उपस्थितीत पेशंट बँकचे लोकार्पण करण्यात आले. महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी करण्यात आली. कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले. सुत्रसंचालन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब व प्रास्ताविक सरपंच लिलाधर अणावकर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर यांनी मानले. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले.