

देवगड ः पावसाळ्यापासून देवगड एसटी स्थानक प्रवेशद्वारासमोर मुख्य रस्त्यावर व एसटी स्थानक परिसरात पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांनी वारंवार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला रेजिंग डे व रस्ता सुरक्षा कार्यक्रमामुळे जाग आली. या कार्यक्रमाच्या औचित्यावर हे खड्डे खडी, वाळू, सिमेंट मिश्रणाने बुजविण्यात आले. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतानाही दखल न घेणारे प्रशासन मंत्री, अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमासाठी खड्डे बुजविते; मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीकडे गेली पाच महिने दुर्लक्ष करते, याहून दुसरे दुर्दैव ते कोणते? असा खंतजनक सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
देवगड एसटी स्थानक नूतनीकरण काम सध्या सुरू आहे. यातील बहुतांशी काम पूर्ण झाले आहे, मात्र शौचालय टाकी न उपसल्यामुळे घाणीचे पाणी स्थानक परिसरात स्त्यावर पसरत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच एसटी स्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. संपूर्ण एसटी स्थानक व आगार परिसर खड्डेमय बनला आहे. या खड्ड्यांमधूनच एसटी फलाटावर लावल्या जातात. याचबरोबर स्थानक परिसरातून गाड्या बाहेर जाण्याचा प्रवेशद्वारावरही महाकाय खड्डे पडले होते. मुख्य रस्त्यावरही खड्डे व स्थानक परिसरातही खड्डे अशी स्थिती गेले पाच महिने होती. या खड्डयांमुळे छोटे मोठे अपघातही झाले. याच खड्डयांमध्ये काही दिवसापूर्वी दुचाकी घसरून अपघात झाला होता. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दुचाकीवर शाळकरी मुले व त्यांचे पालक होते.या मार्गावरूनच देवगड बाजारपेठ, किल्ला, आनंदवाडी कडे वाहतूक सुरू असते. मात्र गावकर कोल्ड्रींक्स आणि एस्टी स्थानकासमोरच महाकाय खड्डे रस्त्यावर पडल्याने स्थानकात बाहेर जाणाऱ्या गाड्या तसेच या मार्गावरून होणारी वाहतुक यांच्यासाठी हे खड्डे धोकादायक ठरत होते.
सा. बां. विभाग व एसटी प्रशासनाने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. मात्र नागरिकांच्या मागणीकडे ना प्रशासनाने लक्ष दिले, ना लोकप्रतिनिधींनी. अखेर प्रशासनाला जाग आली ती 5 जानेवारी रोजी देवगड एस्टी स्थानक परिसरात आयोजित रेजिंग डे आणि रस्ता सुरक्षा कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमाल मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, एसटी विभाग नियंत्रक असे जिल्हास्तरावरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याने रातोरात हे खड्डे सिमेट, वाळू, खडी मिश्रणाने ठेकेदाराकडून बुजवून घेण्यात आले. एवढी तत्परता प्रशासनाने नागरिक वारंवार मागणी करीत होते, तेव्हा का दाखविली नाही? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.