

दोडामार्ग ः हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी छेडलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे पाहून वनविभागाने अखेर यावर तोडगा काढला आणि लवकरच हत्तींना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनाचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. गुरुवारी रात्री उशिरा सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले.
दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे. या हत्तींना रोखण्यास वनविभाग सपशेल अपयशी ठरला. मानव व हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने तात्काळ हत्ती बाधित सरपंच व ग्रामस्थांसोबत बैठक लावावी. शिवाय हत्ती पकड केव्हा पर्यंत राबविली जाईल याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी वनविभागाकडे केली होती. मात्र नेहमीप्रमाणे केवळ आश्वासने देऊन पाठ दाखवणाऱ्या वन विभागाने या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. यामुळे सतंप्त शेतकरी व सरपंच संघटनेच्या सदस्यांनी दोडामार्ग वन कार्यालयात सोमवार 5 जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यात प्रवीण गवस यांसह दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, सरपंच अजित देसाई, साक्षी देसाई, हेवाळे माजी उपसरपंच समीर देसाई, तुकाराम बर्डे, दत्ताराम देसाई यांसह अनेकांनी सहभाग घेतला. आंदोलनाचे जसजसे दिवस वाढू लागले तसतसे ते अधिक तीव्र होऊ लागले.
दरम्यान आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनीदेखील आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
आंदोलनाची तीव्रता पाहून वनविभाग नरमले
वन कार्यालयातील केवळ कागदापुरताच मर्यादित राहिलेला हत्तीचा संवेदनशील विषय आंदोलनामुळे तापू लागला. आंदोलनकर्त्यांना समजावताना वनविभागाची कसरत होऊ लागली. मात्र आंदोलनकर्तेे आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने वनविभागासमोर पेच निर्माण झाले. दोडामार्गचे वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी गुरुवारी दुपारी आंदोलनकर्त्यांची वरिष्ठांशी चर्चा घडवून आणली. वरिष्ठांनी येत्या दोन दिवसांत बैठक लावण्याचे आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले. मात्र तरीही आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम राहिल्याने ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. अखेर रात्री उशिरा सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी वनक्षेत्रपाल संभाजी पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लोखंडी बॅरिकेडस् उभारणार
ज्याप्रमाणे कर्नाटक राज्याने हत्तींना रोखण्यासाठी लोखंडी बॅरिकेडस् उभारले आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लोखंडी बॅरिकेडस् उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच हत्तींना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे लेखी आश्वासनाचे पत्र वैभव बोराटे यांनी दिले व ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. त्यामुळे रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आले.