Mumbai Goa highway chakka jam
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गणेशोत्सव अगदी जवळ आला असतानाही महामार्गाची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे बुधवारी (दि.१३) भर पावसात "हायवे चक्काजाम" आंदोलन करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यांनी सांगितले की, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलन पुकारल्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक आयोजित केली आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. हीच कामे गेली वर्षभर केली गेली नव्हती. पवार यांनी बैठक लावली खरी पण त्या बैठकीला कोकणातील दोन्ही मंत्र्यांना बोलविण्यात आले नाही; म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कळले आहे की, हे दोन्ही मंत्री काही कामाचे नाहीत.
मुंबई-गोवा महामार्गाला टक्केवारीमुळे खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे, हेच आताच्या पालकमंत्र्यांचे कर्तुत्व आणि कार्य आहे. कणकवली बाजारपेठ मध्ये न्यायालयांच्या आदेशाचे अवमान होत आहे तरीसुद्धा त्याकडे कुणी ढुकुनही पाहत नाही. काही ठिकाणी आरो लांईनच्या बाहेरची बांधकामे काढली जात असतील तर ती बांधकामे सर्वांचीच काढा, असे माजी आ. परशुराम उपरकर यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, सुशांत नाईक आदी प्रमुख नेत्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी सर्व प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन ओरोस पोलीस स्थानकात हलविले.
मुंबई-गोवा महामार्गाचे भूमिपूजन अकरा वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. मात्र, आजपर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही. प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी मंत्र्यांकडून महामार्गाची पाहणी व पूर्ण होण्याची डेडलाईन दिली जाते, पण प्रत्यक्षात काम अपूर्णच आहे. यावर्षीही अशीच घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले.
या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, युवक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, श्रेया परब, श्रेया दळवी, बबन बोभाटे, राजू राठोड, राजेश टंगसाळी, बाळा कोरगावकर, अवधूत मालंडकर, पिठ्या उबारे, बाळु पालव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुमरमळा येथे राणे बस स्टॉपजवळ छोटेखानी व्यासपीठ तयार करण्यात आले होते. "मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण ठेवणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो" असा बॅनर लावण्यात आला होता. सर्व नेत्यांच्या गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेले भगवे शेले होते, तर कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाचे बॅनर झळकत होते. आंदोलनादरम्यान महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महामार्ग रस्ते विभागाच्या अधिकारी अनामिका जाधव यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली. गणेशोत्सवापूर्वी रस्ता वाहतुकीस सुस्थितीत व्हावा, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. आंदोलनानंतर आंदोलकांनी महामार्गावर ताडपत्री टाकून ठिय्या दिला.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओरोस पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनानंतर माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, सुशांत नाईक, मंदार शिरसाट आदींना ताब्यात घेऊन ओरोस पोलीस स्थानकात हलविण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरवस्थेबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हुमरमळा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी दुग्धाभिषेक करून व रांगोळी काढून सरकारचा निषेध केला.