राज्‍यस्‍तरीय सागरी जलतरण स्‍पर्धा 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : चिवला बीचवर १६ व १७ डिसेंबरला राज्‍यस्‍तरीय सागरी जलतरण स्‍पर्धेचे आयोजन

निलेश पोतदार

मालवण : पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच वर १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 13 वर्ष ही स्पर्धा होत असून, स्थानिकांसह अनेकांचे तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य स्पर्धेला लाभत आहे. यावर्षी रोटरी क्लब मालवण तसेच अन्य काही सामाजिक स्तरावरून सहकार्य लाभत असल्याचे दीपक परब यांनी सांगितले. मालवण नगरपालिका येथे यासंबंधीची पत्रकार परिषद झाली. यावेळी अरुण जगताप, नीलकंठ अखाडे, युसुफ चुडेसरा, नील लब्दे, सुधीर साळसकर, गुरु राणे, आदी उपस्थित होते.

२००९ पासून सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन केले जात आहे. यावर्षी १६ व १७ डिसेंबर रोजी चिवला बीच येथे होणारी तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष अशी स्पर्धा असून या स्पर्धेत ६ वयापासून ते ७५ वयाहून अधिक स्पर्धक भाग घेत असलेली एकमेव स्पर्धा आहे.

तीन पिढ्यांची म्‍हणजेच मुलगा, वडील, आजोबा अशा तीन्ही पिढ्यांची एकत्र होणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असून, या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दिव्यांग जलतरणपटूंसाठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेचे मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात येणार आहे. तसेच ग्रुपमध्ये पहिल्या दहा विजेत्याला प्रथम, द्वितीय व तृतीय यांना मेडल, रोख बक्षीस, टी-शर्ट, प्रमाणपत्र, नॅपकिन, बॅग, वॉटरबॉटल इत्यादी वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहेत.

स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन १५ व १६ डिसेंबर रोजी पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी १६ तारखेला एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुप ची स्पर्धा होणार असून १७ डिसेंबर रोजी पाचशे मीटर, दहा किलोमीटर, एक किलोमीटर, दोन किलोमीटर फिन्स सागरी जलतरण तसेच दिव्यांग जलतरणपटूंची स्पर्धा होणार आहे. त्याचे रजिस्ट्रेशन मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्थानिक मालवण वासीयांसाठी १५ डिसेंबर रोजी बीच कबड्डी व नौकानयन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.

रजिस्ट्रेशन तसेच स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्थानिक स्पर्धकांनी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष बाबा परब व निल लब्दे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावर्षी प्रथमच दहा किलोमीटर फिन्स सागरी जलतरण स्पर्धा

यावर्षी महाराष्ट्रात (चिवला बीच) प्रथमच दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा व देशातील पहिली फिन्स सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. निवडक व निमंत्रित स्वरूपात प्रत्येक राज्यातील स्पर्धक यात सहभागी असणार आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT