कणकवली : 24 ऑगस्टपासून मुंबईहून चाकरमानी मंडळी कोकणात दाखल होणार आहेत. सिंधुदुर्गात यावर्षी जवळपास 1200 एसटी गाड्या चाकरमान्यांना घेवून मुंबईहून येणार आहेत. चाकरमान्यांच्या या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागातून 110 एसटी बसेस मुंबई, ठाण्यात पाठवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका लांब पल्ल्याच्या आणि जिल्ह्यांतर्गत फेर्यांवर बसला. परिणामी शनिवारी जिल्ह्यातील जवळपास 230 फेर्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे याचा फटका स्थानिक प्रवाशांबरोबरच रेल्वेने दाखल होत असलेल्या चाकरमान्यांनाही बसला आहे.
कोकणात यंदा गणेशोत्सवासाठी सुमारे 5 हजाराहून अधिक एसटी बसेस चाकनमान्यांना घेवून येणार आहेत. त्यापैकी जवळपास 1200 हून अधिक बसेस सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. अर्थात त्यासाठी राज्याच्या विविध विभागातून एसटी गाड्या घेतल्या जातात.
सिंधुदुर्गातूनही जवळपास 110 बसेस चाकरमान्यांना आणण्यासाठी मुंबईला गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत आणि लांब पल्ल्याच्या वाहतूकीवर परिणाम झाला असून 230 फेर्या रद्द कराव्या लागल्या. यामध्ये सावंतवाडी आगार 68, मालवण आगार 30, कणकवली आगार 66, कुडाळ आगार 20, देवगड आगार 16, विजयदुर्ग आगार 17 आणि वेंगर्ले आगार 13 अशा फेर्यांचा समावेश आहे. या फेर्या रद्द झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांना फटका बसला तसेच मुंबईहून दाखल झालेल्या चाकरमान्यांनाही बसला आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशी आणि चाकरमान्यांना खाजगी वाहनांनी आपापल्या गावी जावे लागले.
विशेष म्हणजे या खासगी प्रवासी वाहन चालकांनी देखील दर वाढवल्याने याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागाला.
रद्द झालेल्या फेर्यांमुळे सिंधुदुर्ग विभागातील सुमारे 25 हजार कि.मी. चा प्रवास रद्द झाला. त्यात सावंतवाडी आगार 5353 कि.मी., मालवण आगार 3198 कि.मी, कणकवली आगार 4110.104 कि.मी, देवगड आगार 4666 कि.मी, वेंगर्ले आगार 2404 किमी, विजयदुर्ग आगार 3240.04 कि.मी आणि कुडाळ आगार 2455 कि.मी. प्रवासाचा समावेश आहे.