Kankavli Flyover Encroachment | कणकवली उड्डाणापुलाखाली अतिक्रमण : पोलिस-आरटीओची कारवाई वरवरचीच!

आरटीओ विभागातर्फे वाहनधारकांना आपली वाहने हटविण्याच्या फक्त सूचनाच
Kankavli Flyover Encroachment
कणकवली : सोमवारी राबवलेल्या मोहिमेवेळी उपस्थित पोलिस निरीक्षक अतुल जाधव व आरटीओ अधिकारी तसेच वाहतूक संघटनेचे सुरेश सावंत व अन्य.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : कणकवलीतील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण आणि बकालपणाबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर सोमवारी सकाळी पोलिस, नगरपंचायत, आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी उड्डाणपुलाखाली जमले. मागील वेळेप्रमाणे या वेळेसही वाहनधारक, विविध विक्रेते यांना आपापली वाहने, दुकाने हटविण्याच्या सूचना व दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला मात्र ही कारवाई वरवरचीच आणि दिखाऊपणाची ठरली. या मोहिमेच्या काही तासातच पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती झाली.

आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले व त्यांचे कर्मचारी, कणकवली पोलिस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस तसेच नगरपंचायत विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम व नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. अचानक कारवाईसत्र सुरु झाल्याने उड्डाणपुलाखालील विक्रेते, वाहनधारक चलबिचल झाले होते. आरटीओ विभागातर्फे वाहनधारकांना आपली वाहने हटविण्याच्या सूचना केल्या गेल्या. यात आरटीओ विभागातर्फे काही वाहनेही हटविण्यात आली.

Kankavli Flyover Encroachment
Kankavali Gramsevak Incident | ग्रामसेवकावर ब्लेडने हल्ला : 5 जणांवर गुन्हा

कारवाईप्रसंगी संरक्षण पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांतर्फे ध्वनीक्षेपकाद्वारे पुलाखालील आपापली आस्थापने हटविण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. याचवेळी नगरपंचायत विभाग केवळ बघ्याच्याच भूमिकेत असल्याचे दिसले. वास्तविक या कारवाईत सर्वाधिक जबाबदारी नगरपंचायतीची होती. मात्र, या विभागाकडून अपेक्षित कामगिरी दिसली नाही. सकाळी 11 वा. कारवाईसत्र सुरु झाल्यानंतर दुपारच्या सुमारास वाहन चालक मालक संघटनेतर्फे सुरेश सावंत व काहींनी कारवाईस्थळ गाठून वाहने हटविण्याच्या कारवाईस विरोध केला. आम्हाला पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसेल तर वाहने कुठे उभी करणार?

उड्डाणपुलाची निर्मिती होत होती, त्यावेळी उड्डाणपुलाखाली वाहने उभी करता येतील, असे तोंडी आश्वासन आम्हाला मिळाले होते. मग आज आमच्यावर कारवाई का करता, असा सवाल सुरेश सावंत व इतरांनी केला. अखेर त्यांच्या प्रश्नांना कोणात्याही विभागाचे अधिकारी ठोस उत्तर देऊ शकले नाहीत व त्यानंतर किरकोळ वाहने हटवून कारवाई सुद्धा आटोपण्यात आली.

दीड महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिस आणि आरटीओने अशीच काही प्रमाणात प्रदीर्घ काळ उभे असलेल्या वाहनांवर कारवाई केली होती.

मात्र त्यात सातत्य नसल्याने पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. सोमवारीही केलेली कारवाई अशीच दिखाऊ ठरली मात्र उड्डाणपुल मोकळा श्वास घेणार का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news