वैभववाडी ः सांगुळवाडी-खालचीवाडी येथील मंगेश वासुदेव रावराणे (46) या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्याच्या राहात्या घरात आढळून आला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत त्याचा चुलत भाऊ दिलीप तुकाराम रावराणे यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळाली नाही.
मयत मंगेश रावराणे हा अविवाहित होता. तो वैभववाडी येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. शुक्रवारी सकाळी त्याचे चुलत भाऊ दिलीप रावराणे हे मुंबईवरून गावी आले. मयत मंगेश व त्यांचे एकच घर आहे. ते घरी आले असता घराच्या पुढचा दरवाजा आतून कडी लावून बंद होता. त्यांनी मंगेश याला हाक मारून पाहिली, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच घरातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. ग्रामस्थांनी सिमेंटचा दरवाजा फोडून पाहिले असता, मंगेश याचा मृतदेह सडलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.