

दोडामार्ग ः दोडामार्ग येथे एका अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई दरम्यान महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी लिलाचंद जाधव यांनी फिर्याद दिली असून दोडामार्ग भाजपाचे नगरसेवक राजू प्रसादी यांसह एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
ग्राम महसूल अधिकारी लिलाचंद जाधव हे हेवाळे सजामध्ये कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत. त्याप्रमाणे दोडामार्ग तहसील कार्यालयामार्फत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुक यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. 25 डिसेंबर रोजी नाताळ निमित्त शासकीय सुट्टी होती. परंतु कार्यालयीन कामकाज करण्याकरीता श्री. जाधव व त्यांच्यासोबत वझरे गावचेे ग्राम महसूल अधिकारी किरण कैलास अभंग असे दुपारच्या सत्रामध्ये तहसील कचेरीत शासकीय काम करत होते. सायं. 6 वा. च्या सुमारास नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी श्री. जाधव यांना मोबाईलवर फोन करुन अवैध गौण खनिज वाहतुक करणारा डंपर दोडामार्ग येथे येत आहे. तो डंपर थांबवुन त्याचा पास वैगरे चेक करुन अवैध गौण खनिज असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करा असे सांगितले. त्यामुळे श्री. जाधव व किरण अभंग यांनी ग्राम महसुल अधिकारी कुंब्रल अंकुश दिलीपराव प्रांजळे यांना मोबाईलवर फोन करुन तसेच त्यांच्यासोबत असलेले साटेली-भेडशीचे ग्राम महसूल अधिकारी वैभव खेडेकर यांना ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे थांबण्यास सांगितले. त्यानंतर श्री. जाधव व किरण अभंग हे दुचाकीने रुग्णालया पुढे निवारा हॉटेल येथे थांबले. सायंकाळी 6:30 वा.च्या सुमारास बांदा येथुन दोडामार्गकडे येणारा आयशर कंपनीचा डंपर नंबर जीए 09 यु 5066 हा रुग्णालया जवळ थांबलेल्या ग्राम महसुल अधिकारी अंकुश प्रांजळे यांना थांबविण्याकरीता फोन करुन सांगितले. त्या डंपरच्या मागोमाग श्री. जाधव दुचाकी घेवुन आले. अंकुश प्रांजळे यांनी डंपरचालकास हात दाखवुन थांबविण्यास सांगितले असता डंपर चालकाने कट मारुन डंपर पुढे नेला. त्यामुळे श्री. जाधव यांनी दुचाकी डंपरच्या पुढे घेवून तो डंपर थांबविला.
डंपर चालकाला शासकीय ओळखपत्र दाखवुन आम्ही महसूल कर्मचारी असल्याचे सांगितले.या डंपरमध्ये वाळु असल्याचे दिसुन आले. त्या डंपरचालकाला वाळु वाहतुकीचा पास आहे काय? असे विचारले असता त्याने पास मालकाकडे आहे तो घेवुन येतो असे सांगितले. दरम्यान राजू प्रसादी हे त्यांची कार घेवून आले. त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना उद्देशुन तुम्हाला अशी गाडी अडविण्याचा काय अधिकारी आहे? असे म्हणुन डंपर समोर असलेली श्री. जाधव यांची दुचाकी ओढून बाजुला काढली. श्री जाधव यांनी नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांना फोन करून घटनेची कल्पना देत असताना राजु प्रसादी यांनी श्री. जाधव अंगावरील जर्कीनची टोपी ओढली. तसेच त्यांच्या हातातील फोन हिसकाऊन घेत त्यांना हाताच्या थापटाने माराहाण केली. धक्का-बुक्की करुन ढकलुन दिले. यावेळी श्री. अभंग यांनी श्री जाधव यांना राजु प्रसादी यांच्यापासुन सोडवुन घेतले. ही मारहाण सुरु असताना डंपर चालकाने राजु प्रसादी यांच्या सांगण्यावरुन तेथुन डंपर घेऊन गोवा हद्दीमध्ये पळुन गेला. त्यामागोमाग राजु प्रसादी हे त्यांची चारचाकी घेवुन गेले. या माराहाणीमध्ये श्री. जाधव यांच्या डाव्या हाताच्या पंजाला दुखापत झालेली आहे.
या घटनेची ग्राम महसूल अधिकारी लिलाचंद जाधव यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नगरसेवक राजू प्रसादी व अज्ञात डंपरचालक या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 221(1), 54, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील करत आहेत, अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.