गणेश जेठे
केवळ 6.8 इतका जन्मदर खाली आला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. जिल्ह्यातील एखाद्या गावात 1 हजार लोकसंख्येमागे केवळ 6 मुले वर्षाकाठी जन्म घेत आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जन्मदर हा असल्याचे आरोग्य खात्याच्या सुत्रांचे म्हणणे आहे. कदाचीत देशातही हा दर कमी असावा आणि जगातही खाली असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्याची 2011 साली 8 लाख 49 हजार 651 इतकी लोकसंख्या नोंदली गेली. गेल्या पंधरा वर्षात जगाची आणि देशाची लोकसंख्या वाढत असताना सिंधुदुर्गची मात्र घटली असल्याचा अंदाज आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. 2027 सालात जेव्हा जनगणना होईल तेव्हा हा आकडा निश्चित होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून 100 कि.मी. च्या अंतराच्या परिघात असलेल्या गोवा, बेळगाव, कोल्हापूर आणि रत्नागिरी या शहरांकडे सिंधुदुर्गातून होणारे स्थलांतर व मुंबई तसेच पुण्याकडे तरूणांचा वाढता ओढा जिल्ह्याची लोकसंख्या घटण्यामागे प्रमुख कारण मानले जाते.
जगाची लोकसंख्या 800 कोटींच्या पुढे गेली आहे. जगातील सर्व 195 देशांमध्ये सर्वात जास्त आपल्या भारताची लोकसंख्या असून ती 146 कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्यही लोकसंख्या वाढीत मागे नाही. असे असताना सिंधुदुर्गची लोकसंख्या घटते आहे. जेव्हा 2011 या वर्षामध्ये जनगणना झाली, तेव्हा भारताचा त्यापूर्वीचा दहा वर्षातील लोकसंख्या वाढीचा दर 18 टक्के होता. महाराष्ट्राचा तो 16 टक्के होता. मात्र सिंधुदुर्गचा वाढण्याऐवजी वजा 2.21 इतका कमी झाला होता. याचाच अर्थ सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या घटण्याची सुरूवात 2001 सालापासून सुरू झाली होती. 2011 ते 2025 या पंधरा वर्षातही ही घट सुरूच आहे. यामागे तशी अनेक कारणे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक शासनाच्या नियमांचे पालन करण्यामध्ये सर्वात पुढे आहेत. कुटुंबनियोजन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्गात झाली आणि जन्मदर घटत गेला.
दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2014 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जन्मदर 10 इतका होता. म्हणजेच 1 हजार लोकसंख्येमागे दरवर्षी 10 मुले जन्म घेत होती. तिथुन दरवर्षी जिल्ह्याचा जन्मदर घटत गेला. 2019 मध्ये तो 8.83 पर्यंत खाली आला. 2020 मध्ये किंचितसा वाढून 9.33 वर पोहोचला, परंतु 2021 मध्ये पुन्हा 7 पर्यंत खाली आला. आता तो 6.8 इतका खाली आला आहे. आपल्या देशाचा 2014 साली जन्मदर होता 21 तो आता 19.5 इतका आहे. तर महाराष्ट्राचा दहा वर्षांपूर्वी 16.5 इतका होता तो आता 15 इतका आहे. म्हणजेच देशाचा आणि महाराष्ट्राचा जन्मदर तसा स्थिर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वीसारखी एकाच कुटुंबात तीन-चार मुले जन्माला यायची पध्दत बंद झाली आहे. एकच मूल पुरे असं म्हणून कुटुंबाच्या विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. यातून लोकसंख्येचा दर खालावत चालला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विशेषत: सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या शहरांपासून 30 ते 35 कि.मी. अंतरावर असलेल्या खेडेगावात तरूण रहायला तयार नाही. अशा गावांमधुन शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यामुळे जी काही माणसे आहेत, त्यातील बहुसंख्येने माणसे ही वृध्द आहेत. त्यामुळे अशी अनेक गावे आहेत की त्या गावांमध्ये सद्यस्थिती गरोदर माता नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. हायवेवरील शहरांमध्ये लोकसंख्या वाढते आहे, परंतु अधिक तपाशीलात जावून माहिती घेतली असता जिल्ह्यातील या मोठ्या शहरांमध्ये राहणारी जी मूळ कुटुंबे आहे त्या कुटुंबातील तरूण मात्र शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि परदेशात स्थलांतरीत होत आहेत. परिणामी जिल्ह्यातील शहरांमधील जन्मदरही फारसा मोठा नाही.
स्थलांतर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. केवळ रोजगार हे एकमेव कारण नाही. मूळात सिंधुदुर्गात रोजगार आहे. परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात काम करतात. फक्त जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या लोकांना हवे ते काम जिल्ह्यात मिळत नाही, म्हणून ते स्थलांतर करत आहेत. याशिवाय तरूणांना मुंबईचे फारच आकर्षण आहे. अनेकजण मेट्रोसीटी आणि परदेशात जावून आपलं करिअर घडविण्याचे स्वप्न पाहत आहेत.
चांगल्या युनिव्हर्ससिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी स्थलांतर वाढले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आणि इतर सोयीसुविधा कमी प्रमाणात मिळतात हेही एक कारण आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमधील वाद, देवस्थान वाद यापासून नवी पिढी दूर पळू पाहत आहे. साधा सर्पदंश झाला तर जीव वाचेल की नाही याची शंका असण्याइतपत आरोग्य यंत्रणा खालावलेली असल्यामुळे तरूणांचा ओढा शहरांकडे आहे. गावातील शाळांमध्ये मुलेच नाहीत तर त्या शाळा कसल्या? असा सवाल करत नवी पिढी आपला कुटुंबकबिला घेवून शहराकडे धावतोय. त्यातून स्थलांतर वाढत चालले आहे.
एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जन्मदर वर्षागणिक कमी होत असताना मृत्यूदर मात्र वाढतो आहे. याचे महत्वाचे कारण सेवानिवृत्तीनंतर गावी परतणार्या चाकरमान्यांची वाढती संख्या हे आहे. मुंबईत 30-40 वर्षे नोकरी केल्यानंतर मुंबईचे घर मुलांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करून हे चाकरमानी गावी परततात. साधारणत: वयाच्या पासष्टीनंतर वृध्द दांपत्य गावचा रस्ता धरतात. गावातल्या आपल्या घरात मृत्यू पर्यंतचे जीवन जगतात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू दर देश आणि महाराष्ट्र राज्याच्या दुप्पट आहे. देशाचा 2014 साली जो मृत्यूदर 1 हजार लोकसंख्येमागे 6 इतका होता तोच मृत्यूदर आता 2025 सालापर्यंत कायम आहे. महाराष्ट्राचाही मृत्यूदर जवळपास तितकाच असून गेल्या दहा वर्षात त्यात फारसा बदल झालेला नाही. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यूदर अधून मधून वाढत चाललेला दिसतो. 2014 साली 10.44 इतका मृत्यूदर होता, 2020 सालात कोरोना काळात तो तब्बल 41 इतका पोहोचला होता. 2021 सालात 17, 2022 सालात 12, 2023 सालात 12 आणि 2024 सालात तो 11.8 इतका नोंदला गेला आहे. म्हणजेच सध्या 1 हजार लोकसंख्या असलेल्या एखाद्या गावात जेव्हा वर्षाला 6 मुले जन्म घेतात त्याच वर्षात 11 जणांचा मृत्यू होतो अशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती आहे. म्हणून लोकसंख्या घटते आहे.