सिंधुदुर्ग

Mahashivratri 2024 सिंधुदुर्ग: महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी

अविनाश सुतार

देवगड : पुढारी वृत्तसेवा : हर हर महादेवाच्या गजरात कुणकेश्वर तीर्थस्थान महाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले. कुणकेश्वरची विधीवत पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरूवात झाली. आज (दि.८) पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. रविवारी (दि.१०) पवित्र तिर्थस्नानाने यात्रेची सांगता होणार आहे. Mahashivratri 2024

केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलमताई राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, उद्योजक किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार.अजित गोगटे, कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, परशुराम उपरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, अमोल लोके, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव आदींनी दर्शन घेतले. Mahashivratri 2024

यावेळी मंत्री राणे यांनी कुणकेश्वर धामिर्क स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. ना. राणे यांनी कुणकेश्वर देवस्थानला १ लाख रूपये देणगी यावेळी दिली. कुणकेश्वर यात्रोत्सवामधील बचतगटांच्या माध्यमातून उभारलेल्या स्टॉलचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कुणकेश्वर यात्रा तीन दिवस असून या यात्रेला सकाळपासूनच भाविकांचा जनसागर लोटला होता. यात्रेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने, चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलुन गेला होता. या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपरिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती. कुणकेश्वरच्या समुद्रकिनारीही भेळ,आईस्क्रिम, हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारा दुकानाने भरून गेलेला दिसून येत होता. चायना वस्तू ते हस्तकला, धामिर्क व सामाजिक संस्थांची माहिती देणारी केंद्रे यातून यात्रा सजली होती.

गृहपयोगी वस्तु, कलिंगड बाजार यांनी संपूर्ण कुणकेश्वर सजले होते. मंदिर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व सेवा मंडळ यांनी खास रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. सागरी सुरक्षेच्या दृष्टिने लाइफ जॅकेट धारक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी सतर्कतेने काम करत होते. तसेच ग्रामस्थांचे भरारी पथक देखील समुद्रस्नान करणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेऊन आहे. सायंकाळपासून समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचा उच्चांक दिसून येत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT