सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेल्या उमेदवार उल्का वारंग आणि त्यांचे पती विधानसभा प्रमुख उमाकांत वारंग यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी प्रक्रियेकडे पाठ फिरवली. यामुळे गटात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवारच नॉट रिचेबल झाल्याने राष्ट्रवादीला केवळ पाच जणांचे एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरून समाधान मानावे लागले.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उल्का वारंग यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी अनभिज्ञता व्यक्त्य केली. ‘त्यांच्या अनुपस्थितीबाबत अद्यापपर्यंत आपल्याला काही समजले नाही. त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले होते, परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल होता. त्यामुळे नेमके काय झाले, हे आपण त्यांच्याशी भेटून चर्चा करू. नंतरच आपल्याला ते कळेल. तोपर्यंत आपण तूर्तास काहीच बोलू शकत नाही.’ असे श्री. भोसले म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, ऑगस्तीन फर्नांडिस, रिद्धी परब, रोहन परब, दिशा गुरुदत्त कामत, रवळोजीराव ऊर्फ उदय कृष्णराव भोसले, रंजना रामचंद्र निर्मल, ऑगोस्टीन पास्कु फर्नांडिस, सत्यवान कृष्णा चेदंवणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.