

सावंतवाडी ः सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत रविवारी महायुतीतील शिंदे शिवसेना व भाजपने मिळून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले. शिवसेनेने आ. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत रॉली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत 20 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी ॲड. नीता सावंत कविटकर यांचा अर्ज भरला तर भाजपने नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांच्यासह चौदा नगरसेवक यांचे अर्ज दाखल केले. या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांनी आपले अर्ज दाखल केले आहेत यामुळे सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत रविवारी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेने संपर्क कार्यालय ते नगरपालिकापर्यंत रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आ. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता सावंत- कविटकर यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत वीस नगरसेवक पदाचे उमेदवारांनीही आपले अर्ज भरले. यात माजी नगरसेवक दीपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, गोविंद वाडकर यांचा समावेश आहे. या सर्वांना शिंदे शिवसेने तर्फे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. सकाळी 12 वा. शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपकडून दु. 2 वा. युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांनी अर्ज भरला. यावेळी युवराज लखम सावंत, राणी साहेब शुभदा देवी भोसले राजकीय पदाधिकारी यांच्या सोबत त्यांच्या माहेरचे दोडिया घराणेही उपस्थित होते.
त्यानंतर चौदा उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. महत्वाचे म्हणजे भाजप पक्षाने त्यांना अद्याप एबी फॉर्म दिलेले नाहीत. ते सोमवारी दिले जातील असे सांगण्यात आला. भाजप कडून नगरसेवक पदासाठी भरण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये काही माजी नगरसेवक यांना ही स्थान देण्यात आले आहे. त्यात बबन साळगावकर, सुधीर आडीवरेकर, दीपाली भालेकर, राजू बेग, आनंद नेवगी, उदय नाईक, समृद्धी वीरनोडकर यांचा समावेश आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनीही रविवारी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी दोन अर्ज भरले असून अपक्ष व भाजप पक्षातर्फे त्यांनी या पदाकरिता दावा केला आहे. भाजप पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी शिंदे शिवसेनेचे आ. दीपक केसरकर यांची ही भेट घेतली होती. परंतु त्यांना तिथे ही नकार देण्यात आला असे समजते. शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती मोरे यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपच्या उर्वरीत सहा नगरसेवकांचे अर्ज सोमवारी भरण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून प्रभाग सहा ब मधून देव्या सूर्याजी यांनी नगरसेवक पदाचा अर्ज भरला या प्रभागात अर्चित पोकळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे सूर्याजी हे नाराज होते. मात्र ऐनवेळी पोकळे यांना मागे ठेवत देव्या सूर्याजी यांना संधी देण्यात आली. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले मात्र भाजपने ते टाळत अगदी साध्या पद्धतीने आपले अर्ज दाखल केले. प्रभाग सात मधून शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस कडून आघाडी न झाल्याने उबाठा सेनेतर्फे सीमा मठकर यांनी यापूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असल्याने काँग्रेस कडुन नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.