वैभववाडी : गोव्याहून सोलापूरकडे कोंड्याच्या पोत्यांआड लपवून होणारी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी वैभववाडी पोलिसांनी उधळून लावली. कुसूर-पिंपळवाडी फाटा येथे केलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे 13 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
याप्रकरणी अय्याज शहा आलम पठाण (वय 33, रा. घानेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) व सोमनाथ भीमराव कसबे (वय 37, रा. रामहिंगणी, ता. मोहळ, जि. सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास वैभववाडी-नापणे मार्गावर कुसूर-पिंपळवाडी फाटा येथे नाकाबंदी सुरू होती. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी नापणेच्या दिशेने एक महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच 13 डीई 9545) वेगाने आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून चालकाकडे चौकशी केली. चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी गाडीच्या हौद्याची पाहणी केली असता, त्यात कोंड्याची पोती भरलेली दिसली. मात्र, ही पोती वरवरच रचल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी ती बाजूला केली. पोत्यांच्या खाली गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स मोठ्या शिताफीने लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ स्थानिक पंचांना बोलावून पंचनामा केला आणि गाडी पोलिस ठाण्यात आणली. तेथे मोजदाद केली असता, गाडीत एकूण 5 लाख 4 हजार रुपये किमतीची गोवा दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे 8 लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो असा एकूण 13 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहाय्यक निरीक्षक राजन पाटील यांच्यासह पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल अजय बिल्पे, हरीश जायभाय, किरण मेथे, महिला पोलीस योगिता जाधव, सूर्यकांत माने, रघुनाथ जांभळे यांच्या पथकाने केली.