

वैभववाडी : तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी पुन्हा वैभववाडी तालुक्यात धुमाकूळ घातला. या पावसाने वैभववाडी बाजारपेठेत गटाराचे पाणी भरल्यामुळे आठवडे बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली. गुडघाभर पाण्यात विक्रेते व ग्राहकांना कसरत करावी लागली.
तालुक्यात गेले तीन-चार दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र बुधवारी सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी वर सरी कोसळत होत्या. बुधवारी वैभववाडी शहरातील आठवडा बाजार असल्यामुळे शहरात भाजीपाला, कपडे, चप्पल, कपडे, किराणा माल व अन्य दुकाने घेऊन फिरते व्यापारी आले होते. त्यांनी शहरात रस्त्याकडेला नेहमीप्रमाणे आपआपली दुकाने थाटली होती. मात्र सकाळी 10.45 वा.च्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने गटारातले पाणी गटाराने न जाता शहरात रस्त्यावर आले. त्यामुळे गुडाघाभर पाणी साचाले होते. फिरत्या व्यापार्याची आपले सामान वाचवण्यासाठी एकच तारांबळ उडाली.
काही व्यापार्यांचे नुकसान झाले. तर या पावसाचा फटका आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना सुद्धा बसला. एकीकडे पाऊस, रस्त्यावर आलेले चिखलाचे पाणी यातून मार्ग काढत खरेदी करावी लागली.