कणकवली : नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ कणकवलीत भाजपच्या वतीने शनिवारी सायंकाळी पटकीदेवी मंदिर ते पटवर्धन चौक अशी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, माध्यमांशी बोलताना मंत्री राणे यांनी, पुढची पाच वर्षे आम्हाला कणकवलीकरांनी सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नलावडे, त्यांची सर्व टिम व आम्ही कणकवलीकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी ग्वाही दिली.
या प्रचार रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष्ा प्रभाकर सावंत, माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्र. 17 चे उमेदवार अबीद नाईक, माजी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, नितेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, समीर नलावडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. रॅली दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यापारी, नागरीकांशी संवाद साधला.
कणकवली आणि राणे यांचे नाते घट्ट
रॅलीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, आम्ही शक्तीप्रदर्शन केलेले नाही, परंतु जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठींबा कशाला म्हणतात, भाजपच्या पाठीमागे जनता किती ताकदीने उभी आहे हे आजच्या रॅलीतून दिसून आल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री नितेश राणे म्हणाले, आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी कणकवलीत फेरफटका मारला, जनतेशी बोलले, सुरू असलेले प्रकल्प खुल्या डोळ्यांनी शुध्दीत राहून पाहीले तर तुम्हाला नावं ठेवण्यासाठी जागाच राहाणार नाही. आम्ही विकासाच्या जोरावर मते मागत आहोत. कुणावर टिका टिप्पणी करणार नाही. वर्षानुवर्षे खा. राणे यांच्या विचारांची कणकवली राहीली आहे.
भाजपचा बालेकिल्ला आज कणकवली आहे. यापूर्वी अनेकदा कणकवली आणि राणे यांना दुभंगण्याचे प्रयत्न झाले परंतु कधीच कोणी यशस्वी झाले नाहीत. आता तर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्या राणे कुटूंबातलाच एक सदस्य आमच्या विरूध्द लढण्यासाठी लागतो हा त्यांचा नैतिक पराभव आहे. आमच्या प्रतिस्पर्धांकडे स्वतःची शक्ती नाही, ओळख नाही. त्यांना राणे कुटूंबातलाच एक सदस्य लागतो, यापेक्षा राणेंच्या शक्तीचे तुम्हाला काय प्रदर्शन हवे आहे? आज प्रत्येक गल्लीगल्लीमध्ये खा. राणेंचाच आवाज घुमताना दिसतो.
भाजपचा पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खा. नारायण राणे आणि आपण पालकमंत्री ही सर्वच्या सर्व शक्ती कणकवलीकरांच्या सेवेसाठी सज्ज आहोत. कोणी कितीही टिका केली तरी कणकवलीकर भाजप उमेदवारांच्याच पाठीशी राहतील. शहर विकास आघाडी ही राणे द्वेषातून निर्माण झाली आहे. शिंदे शिवसेनेने उबाठा बरोबर जावू नये असे खा. राणे यांनी स्पष्ट सांगितले होते. ही आघाडी खा. राणेंच्या इच्छेविरोधात आहे. कणकवलीकर जनता सुज्ञ आहे, 2 डिसेंबरला जनता विरोधकांना चोख उत्तर देईल असे मंत्री राणे म्हणाले.