दोडामार्ग : दोडामार्ग महसूल विभागाने अवैध उत्खननप्रकरणी सील केलेल्या खनिजयुक्त माती चोरीप्रकरणी दोन डंपर व जेसीबी ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी मोरगाव येथे घडला. संबंधित दोषींवर एफआरआय दाखल करून कठोर कारवाई करण्याची कार्यवाही चालू असल्याचे तहसीलदार राहुल गुरव यांना सांगितले.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी, महसूल विभागाला अंधारात ठेवून मोरगाव येथे खनिजयुक्त मातीचे अवैध उत्खनन करण्यात आले होते. या अवैध उत्खननाची माहिती मिळताच दोडामार्ग महसूलच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत सदर खनिजयुक्त माती महसूल विभागाने सील करून ताब्यात घेतली आणि मोजमाप करून त्या मातीचा साठा मोरगाव येथेच ठेवला होता. एकूण 168 ब्रास खनिजयक्त माती जप्त करून सील करण्यात आली होती. या मातीची चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. महसूल पथकाने सोमवारी (ता. 5) मोरगाव येथे साठा करण्यात आलेल्या जागी धाड टाकली.
यावेळी तेथे जेसीबीच्या सहायाने दोन डंपर मध्ये माती भरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. महसुलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. तहसीलदार राहुल गुरव यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, झोळंबे तलाठी श्रीराज सांभारे, पवन लोले, सुयोग चौगुले या पथकाने ही कारवाई केली. कारवाईत दोन्हीं डंपर व जेसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. दरम्यान पथकाच्या येण्याची चाहूल लागताच जेसीबी व डंपर चालक तसेच कामगार फरार झाले. ताब्यात घेण्यात आलेले डंपर पोलिस पाटीलांच्या ताब्यात दिल्याची माहिती महसूल विभागाने दिली. या प्रकरणातील फरार संशयितांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
25 ब्रास माती लंपास
मागील काही दिवसापासून या खनिज युक्त मातीची चोरी सुरू होती. सोमवारी महसूलने कारवाई केली असली तरी या कारवाई अगोदर सुमारे 25 ब्रास मातीची चोरी झाल्याचे दिसून आले. सध्या जाग्यावर महसूलने सील केलेली 143 ब्रास माती असल्याचे ग्राम महसूल अधिकारी पवन लोले यांनी सांगितले.
कडक कारवाई करणार
मोरगाव येथे खनिज युक्त माती साठा महसूल विभागाने सील केला होता. त्याच मातीची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. आम्ही प्रत्यक्ष जागी जाऊन वाहने जप्त केली आहेत. आता यासंबंधी दोषींवर कठोर कारवाई करण्याची कार्यवाही चालू असल्याचे दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनी सांगितले.