सिंधुदुर्ग

Kankavali News | माणुसकीचा झरा जेव्हा नदी होऊन वाहतो...!

Kankavali News | आपली ऑजळ पूर्ण भरली की उरलेले धन संकटात असलेल्या जीवांना द्यावे हा विचार आजही सामाजिक ओलावा निर्माण करणारा ठरला आहे.

पुढारी वृत्तसेवा

कोण म्हणतं माणुसकी संपली ?...

अजिबात नाही, समाज कितीही बदलत गेला तरी त्याने माणुसकीची संगत ढिली केलेली नाही. कणकवली तालुक्यातील हरकुळखुर्द-खालची तेलीवाडीतील चार भावंडं आपल्या आई-वडिलांच्या निधनामुळे जेव्हा पोरकी झाल्याचे कळले तेव्हा त्यांच्या मदतीसाठी सुरू झालेला माणुसकीचा झरा बघता बघता केव्हा नदी होऊन वाहू लागला कळलंच नाही. आश्चर्य वाटावं अशी मदत लोकांनी केली.

आपली ओंजळ पूर्ण भरली की उरलेले धन संकटात असलेल्या जीवांना द्यावे हा विचार आजही सामाजिक ओलावा निर्माण करणारा ठरला आहे. दै. 'पुढारी'ने 'वास्तव' या सदरातून खानविलकर कुटुंबातील पोरक्या झालेल्या चार भावंडांची कहाणी लोकांसमोर आणली होती. तन्वी, प्रथमेश आणि योगिता अशा चार भावंडांच्या आईचे गेल्या जानेवारी महिन्यात आणि त्यापूर्वी दीड वर्ष अगोदर वडिलांचे निधन झाले होते. या घटनेची बातमी दै. पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची पहिल्या प्रथम दखल घेतली ती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी.

त्यांनी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांना तत्काळ त्या मुलांना भेटून मदत करण्याची सूचना केली. हरकुळखुर्दचे सरपंच राजन रासम यांना सोबत घेऊन मनोज रावराणे यांनी तातडीची आर्थिक मदत केली. मदतीचा हा असा झरा सुरू झाला. शाळेत शिकणारी मुले कोणत्याही शाळेतील असो, त्यांच्याप्रति शिक्षक किती संवेदनशील आहेत हे या घटनेतून पुढे आले. शिक्षक दशरथ शिंगारे, दिलीप शेळके यांनी पुढाकार घेऊन शिक्षक प्रकाश गाताडे अध्यक्ष असलेल्या उमेद फाऊंडेशनने या मुलांना मदतीसाठी पुढाकार घेतला.

या मुलांना दरमहा लागणारा 2500 रु. किमतीचा किराणा माल देण्याचा निर्णय झाला. तोही सहा महिने किंवा वर्षभर नाही... तर तब्बल पुढील पाच वर्षे दरमहा या मुलांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे. या शिक्षकांकडून आणि इतर माध्यमातून ही बातमी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यापर्यंत पोहोचली. अधिकारी जिल्ह्यात येतात, सेवा बजावतात आणि बदली होऊन निघून जातात.

खेबुडकर यांनी मात्र समाजाप्रति संवेदना जोपासत थेट हरकुळखुर्दमध्ये धाव घेतली. हरकुळखुर्द-गावडेवाडी शाळेत छोटेखानी बैठक घेतली. सरपंच राजन रासम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश दळवी, माजी उपसरपंच संजय रावले, 'उमेद'मध्ये काम करणारे सर्व शिक्षक, त्या शाळेतील मुख्याध्यापक सुनील ठाकूर, राजाराम भिसे या शिक्षकांशी चर्चा केली. ग्रामस्थही या चर्चेत सहभागी होते.

ग्रामसेवकही मदतीसाठी पुढे आले. याच बैठकीत किमान ५ लाख रुपये या मुलांना गोळा करून देऊ असे उद्दिष्ट खेबुडकर यांनी सर्वांसमोर ठेवले. सर्वांना त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचेही ठरले. इथेच न थांबता खेबुडकर यांनी मुलांच्या घरी जावून त्यांना दिलासा दिला. ठरल्याप्रमाणे शिक्षक कामाला लागले. मदत गोळा होण्यास सुरुवात झाली. ग्रामसेवक संघटनाही मदतीसाठी धावली. त्यांनीही मदतीसाठी मेहनत सुरू केली.

खानविलकर कुटुंबियांच्या तेली समाजापर्यंत ही बातमी पोहोचली. आपल्या समाजातून ही मदत मिळायला हवी यासाठी प्रयत्न सुरू झाला. तेली समाजाचे पदाधिकारी आणि समाजबांधव त्यासाठी कामाला लागले. याच गावाला लागून असलेल्या कोंडये गावातील तेली समाजानेही पुढाकार घेतला आणि मदत गोळा केली. ग्रामसेवक संघटना आणि तेली समाज यांनी मोठी मदत गोळा केली. बघता बघता माणुसकीच्या झऱ्याचे रुपांतर नदीत झाले. 5 लाख रुपयांवर मदत जमली.

पालकमंत्र्यांनी सुरुवातीलाच बातमीची दखल घेत मदतीच्या सूचना केल्या होत्या. एवढी मदत जमा झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सहाय्यक बीडीओ वालावलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वर्दम, शशिकांत तांबे, व्ही. व्ही. ठाकूर या सर्वजणांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. मदत कशी गोळा केली याची माहिती दिली. तब्बल ५ लाख 20 हजार रुपयांच्या रक्कमेचा प्रतिकात्मक धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या मुलांना देण्यात आला.

दै. पुढारीमध्ये ही कहाणी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लोकांनी खानविलकर कुटुंबियांशी संपर्क साधला. संजय रावले यांनी तर बालसंगोपन योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी मेहनत घेतली. एवढेच नव्हे तर शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभही त्यांनी मुलांना मिळवून दिला. अर्थातच या भावंडांसाठी त्यांच्या वाडीतील खानविलकर कुटुंबानीही सुरक्षिततेचे छत्र धरले आहे. समाज कितीही बदलत गेला तरी माणुसकी आजही कायम आहे, हा आशावाद अधिक दृढ झाला आहे.

अभ्यास करून मोठे व्हा !

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व अधिकारी, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी यांचे या मदतीसाठी खूप कौतुक केले. जी रक्कम गोळा झाला आहे ती सुरक्षित ठेवा आणि मुलांच्या भवितव्यासाठी त्यांचा योग्य पद्धतीने वापर करा अशा सूचना करतानाच मुलांना अभ्यास करून चांगले शिक्षण घ्या आणि मोठे व्हा, असा सल्ला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT