

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदा मे महिना संपत आला, तरी महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना गती मिळालेली नसल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बांधकाम विभागाची कानउघाडणी केली. पावसाळा सुरू होण्यास अवघे दोन आठवडे उरले असताना नालेसफाई, चेंबर्स दुरुस्ती, पावसाळी गटारांची स्वच्छता तसेच शहरातील पाणी साचणाऱ्या ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत बांधकाम, नगररचना आणि घनकचरा विभागाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. यात शहरातील नैसर्गिक नाले, आरसीसी पावसाळी गटारे, खुली गटारे आणि क्रॉनिक फ्लडिंग स्पॉट्सवरील पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत विभागनिहाय ठेकेदारांमार्फत नाले व गटारांची साफसफाई केली जाते. मात्र यंदा मे महिन्याचे तीन आठवडे उलटूनही अनेक ठिकाणी कामे सुरू झाली नसल्याचे निदर्शनास आले. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत पावसाळापूर्व सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील नालेसफाईबरोबरच नंदिनी नदी स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचा दावा बैठकीत करण्यात आला.
पावसाळी गटारात बांधकाम साहित्य
सध्या शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमुळे अनेक पावसाळी गटारांत माती आणि बांधकाम साहित्य साचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे तातडीने मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या २८ रस्त्यांची डागडुजी संबंधित ठेकेदारांकडून करून घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.
ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी आराखडा
पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या शहरातील २११ क्रॉनिक ब्लॅक स्पॉट्सची नोंद महापालिकेने केली असून, त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.