सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण व कणकवली या चार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार 17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी या चारही नगरपरिषदांसाठी दाखल अर्जांची संबंधित तहसील कार्यालयामधून छाननी करण्यात आली. यात चार नगराध्यक्षपदांसाठी दाखल 31 अर्जांपैकी 7 अर्ज अवैध ठरले. तर नगरसेवक पदांसाठी दाखल 390 उमेदवारी अर्जांपैकी 70 एवढे अर्ज अवैध ठरले.
मंगळवारी सकाळपासून सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण व कणकवली तहसील कार्यालयामध्ये या अर्जांची छाननी उमेदवारांच्या उपस्थितीत करण्यात आली. कणकवली व मालवण या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर काही आक्षेप घेण्यात आले. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावले. सावंतवाडी नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष पदासाठी 11 अर्ज दाखल होते. पैकी 5 अर्ज अवैध ठरला. वेंगुर्ले नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी दाखल 8 पैकी 2 अर्ज अवैध ठरले. कणकवली नगरपंचायतीसाठी दाखल 6 पैकी 1 अर्ज अवैध तर मालवण नगरपरिषदेसाठी दाखल 6 पैकी 3 अर्ज अवैध ठरले. अशा प्रकारे चारही नगरपरिषदांमध्ये मिळून नगराध्यक्षपदाचे 11 अर्ज अवैध ठरले.
नगरसेवकपदांसाठी या चारही नगरपरिषदांमध्ये मिळून 390 अर्ज दाखल होते. यात सावंतवाडी नगरपरिषदेत दाखल 125 पैकी 31 अर्ज अवैध, वेंगुर्ले नगरपरिषदेत दाखल 123 पैकी 24 अर्ज अवैध, कणकवली नगरपंचायतीत दाखल 56 पैकी 7 अवैध तर मालवण नगरपरिषदेत दाखल 76 पैकी 8 अर्ज अवैध ठरले. अशा प्रकारे चारही नगरपरिषदांमध्ये मिळून नगरसेवकपदाचे 70 अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे या चारही नगरपरिषदांमध्ये मिळून 320 उमेदवार रिंगणात आहेत. तर चार नगराध्यक्षपदांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर असून या नंतरच लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.