

नांदगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग–कासार्डे राज्य मार्गावरील वेळगिवे हद्दीत असलेल्या धोकादायक नागरी वळणाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव गावातील सुधाकर सिताराम गुरव (40) आणि अनंत बाबला गुरव (60) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात दूर फेकले गेले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
सुधाकर व अनंत गुरव हे दोघे विजयदुर्ग–कासार्डे मार्गावरून तळेरे येथे कामानिमित्त जात असताना समोरून येणाऱ्या चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. स्थानिकांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेला कळवले; मात्र डॉक्टरांनी दोघेही मृत असल्याचे घोषित केले.
घटनेनंतर फणसगाव पोलीस पाटील स्वप्नील नारकर, पाटगाव सरपंच नितेश गुरव, भाजप मंडलाध्यक्ष महेश नारकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. विजयदुर्ग पोलिसांनाही माहिती देण्यात आली. उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांच्यासह वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले.
ट्रक चालक व मालक घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी आणि लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले.
या अपघातामुळे पाटगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मृत सुधाकर गुरव यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तर अनंत गुरव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, या मार्गावर होणाऱ्या अनियंत्रित चिरे वाहतुकीबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.