Kudal Flood Situation
कुडाळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात पूरस्थिती

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कुडाळ तालुक्यात गुरूवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी पहाटेपासून नदीकिनारील भागात पूरस्थिती निर्माण झाली. भंगसाळ (कर्ली), वेताळबांबर्डे- हातेरी व हुमरमळा-पिठढवळ या प्रमुख तीनही नद्यांना महापूर आल्याने नदीकिनारा परिसर जलमय झाले. त्यामुळे नदिकाठच्या शेतमळ्यांना तलावांचे स्वरूप प्राप्त झाले. शिवाय नदीकाठावरील कुडाळ शहर, पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, हुमरमळा, बांव, बांबुळी, मुळदे, आंबडपाल यांसह अन्य भागात मिळून सुमारे 70 ते 80 घरांना पहाटेलाच पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे साखर झोपेतच नागरिकांची तारांबळ उडाली.

शहरातील रेल्वेस्टेशन रोड व हॉटेल गुलमोहर समोरील मुख्य रस्ता, तसेच पावशी येथे घावनळे मार्ग पाण्याखाली गेल्याने या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. माणगाव खोर्‍यातही सखल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली. दरम्यान तालुक्यात एनडीआरएफ टीमला सोबत घेऊन प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी पहाटेपासून पूरबाधित भागाला भेटी देऊन, आढावा घेतला.

तालुक्याच्या बहुतांशी भागाला गेल्या पंधरा दिवसांत चार ते पाचवेळा पुराचा फटका बसला आहे. शुक्रवारी माणगांव खोर्‍यात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे या भागातील सर्व कॉजवे पाण्याखाली गेले. भंगसाळ (कर्ली) नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे हातेरी नदी व हुमरमळा पिठढवळ आदी सर्वच नदीकिनारील परिसरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच तालुक्यात पुरस्थिती निर्माण होण्यास सुरूवात झाली. पहाटे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, भैरववाडी, कविलकाटे, काळपनाका, पावशी, शेलटेवाडी, बोरभाटवाडी, खोतवाडी, सीमावाडी, वेताळबांबर्डे तिठा, तेलीवाडी, पणदूर, अणाव, हुमरमळा, बांव, बांबुळी, मुळदे, आंबडपाल, पिंगुळी, चेंदवण, सरंबळ या भागातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. काही घरांत पाणी शिरून नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास पुराचा वेढा बसल्याने काही घरातील कुटुंबे घरातच अडकली. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. गुरे, पाळीव जनावरे तसेच वाहनेही सुरक्षित ठिकाणी आणण्यात आली.

कुडाळ शहरातील सिद्धिविनायक हॉल नजीक रेल्वेस्टेशन रोड व कविलकाटे येथे बांव रस्ता, हॉटेल गुलमोहर समोरील मुख्य रस्ता तसेच पावशी येथे घावनळे मार्गावर पुराचे पाणी आल्याने सकाळपासूनच हे मार्ग वाहतुकीस बंद झाले. शहरातील पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मुंबई- गोवा महामार्गावर काळपनाका बॉक्सवेल व सर्व्हिस रोडवर पुराचे पाणी येण्यास सुरूवात झाली होती. सगळकडेच पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. एसटी, वीज, दुरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. ठिकठिकाणी झाडे पडून तसेच पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले.

पुराचे पाणी लोकवस्तीत शिरत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी कुडाळ शहर, ओरोस, कसाल, पावशी, वर्दे व अन्य भागात पहाटे 4 वा.पासून ऑन फिल्ड येत पूरबाधित भागात प्रत्यक्ष भेट दिली. तसेच खबरदारीच्या दृष्टीने एनडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आले.

शेतीला फटका

वारंवार निर्माण होत असलेल्या पुरस्थितीचा मोठा फटका नदीकिनारील भातशेतीला बसला आहे. नद्यांच्या पुराचे पाणी लगतच्या शेतमळ्यात पसरत असल्याने भातशेती चार चार दिवस पुराच्या पाण्याखाली राहत असल्याने ती कुजून तसेच वाहून नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शासनाकडून मोठी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दुकानवाड कॉजवे 15 दिवस पाण्याखाली

माणगांव-शिवापूर मार्गावरील कर्ली नदीवरील दुकानवाड कॉजवे गेले पंधरा दिवस पाण्याखाली आहे. यामुळे एसटी व वाहने पुढे जात नाही. परिणामी दुकानवाड कॉजवेच्या पुढे असलेल्या उपवडे, साकिर्डे, आंजिवडे, वसोली, शिवापूर या पाच गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येणार्‍या पावसानंतर तरी या कॉजवेच्या ठिकाणी उंच पूल बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

SCROLL FOR NEXT