Sindhudurg Dodamarg Rain  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Dodamarg Heavy Rain| दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

Sindhudurg Dodamarg Rain|दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग - दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. नदी, नाले आणि ओहोळ दुथडी भरून वाहू लागल्याने तालुक्यातील अनेक लहान-मोठे कॉजवे पाण्याखाली गेले. परिणामी, अनेक गावांचा संपर्क तुटला, तर रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने झाडांची पडझड झाली असून अनेक गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. एकंदरीत मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत केले आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होता. मात्र रविवारी सकाळपासून सुरू झालेला संततधार पाऊस सोमवारी दुपारनंतर मुसळधार कोसळू लागला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले आणि ओहोळ तुडूंब भरून वाहू लागले. गटारे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी थेट रस्त्यांवर आले आणि अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण झाली. दोडामार्ग शहरातील मुख्य राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ नदीसारखे दृश्य निर्माण झाले.

बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील राज्यमार्गाला देखील नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याने वाहतूक मंदावली. वाहनचालकांना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागला. तालुक्यातील घोटगेवाडी, परमे, कुडासे आदी ठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला.

दरम्यान, तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा ८५.५० टक्के झाला असून धरणातून सुमारे ३ लाख १२ हजार ६० लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच तेरवण-मेढे उन्नयी बंधाऱ्यातून ६३ हजार २२० लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी तिलारी नदीत मिसळत असल्याने नदीची पातळी वेगाने वाढत आहे.

तिलारी नदीची इशारा पातळी ४१.६० मी. असून सध्याची पाणी पातळी ४०.६० मी. इतकी झाली आहे. हे पाणी इशारा पातळीच्या जवळ पोहोचल्याने नदीकाठच्या परिसरात पाणी पसरू लागले आहे. फळबागा आणि शेती पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिलारी परिसर पुन्हा एकदा जलमय होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील बहुतांश गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT