

आंबोली : आंबोली परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी कावळेसाद पॉइंट व गेळे गावाला जोडणारा रस्ता व त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने शेकडो पर्यटकांना माघारी फिरावे लागले. तर काही अतिउत्साही पर्यटक पुराच्या तीव्र प्रवाहात प्रवेश करत स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसत होते.
सद्या आंबोली परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिसरातील सर्वच नदी-नाल्यांना प्रचंड पूर आला आहे. गेळे-कावळेसाद पॉईंटला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पूराचे पाणी वाहू लागले होते. यामुळे कावळेसाद पॉईंट येथे गेलेल्या पर्यटकांची मात्र मोठी कोंडी झाली होती.
दरम्नान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि प्रवासासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करत मदत केली. कोणीही धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे धाडस करू नये. तसेच आंबोली व कावळेसाद परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी प्रवास करताना सर्व काळजी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन सरपंच ढोकरे यांनी केले आहे.