­­Sindhudurg News : तुटलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने तीन म्हशींचा मृत्यू

दोडामार्ग-आयी मार्गावरील धाटवाडी येथे दुर्घटना
­­Sindhudurg News
तुटलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने तीन म्हशींचा मृत्यू
Published on
Updated on

दोडामार्ग : तुटलेल्या विद्युतभारित तारांचा स्पर्श होऊन तीन दुभत्या म्हशी दगावल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यात शेतकरी शिवराम वसंत साळकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळेच आपले नुकसान झाल्याचे शेतकरी साळकर यांनी आरोप केला आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कारभाराविरोधात परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दोडामार्ग-आयी मार्गावरील धाटवाडी येथील शिवकृपानगर परिसरात अनेक दिवसांपासून वीजवाहिन्या जीर्ण अवस्थेत आहेत. स्थानिकांनी याबाबत वारंवार सूचना देऊनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. रविवारी या परिसरातील वीजवाहिनी तुटून रस्त्यालगत पडली. विशेष म्हणजे वाहिनी तुटून पडूनही त्यामध्ये विद्युतप्रवाह सुरूच होता.

कसई येथील शेतकरी शिवराम साळकर यांनी त्यांच्या म्हशी चरण्यासाठी सोडल्या होत्या. तुटलेल्या वीजवाहिनीच्या संपर्कात येताच तिन्ही म्हशींना जबरदस्त विद्युत धक्का बसला आणि त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती तातडीने महावितरण विभागाला देण्यात आली. मात्र गंभीर प्रकार घडूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महावितरणच्या बेजबाबदार कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यातही देण्यात आली असून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news