Sindhudurg Crime News
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली) यांनी एका व्यक्तीचे वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली असून, संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस निरीक्षक दिपक माळी यांनी दिलेल्या माहिती नुसार, ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, या बिलात त्रुटी असल्याचे सांगून कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच १८,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १०,००० रुपये ठरवण्यात आली.
तक्रारदाराने या संदर्भात कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, ४ मे २०२६ रोजी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षातच एसीबीने सापळा रचला. ठरलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई ला.प्र.वि. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी आणि त्यांच्या टीमचा समावेश होता.