

जळगाव : पारोळा येथील कुटीर रुग्णालयातील सहायक अधिक्षक विजय प्रकाश वाघ (वय ४२) याला एका सफाई कामगाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. स्वतःच्या हक्काच्या 'स्थायी' आदेशासाठी धडपडणाऱ्या एका गरीब अनुकंपा कर्मचाऱ्याला या लाचखोर 'वाघा'ने वेठीस धरले होते, मात्र अखेर तो स्वतःच एसीबीच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? यातील तक्रारदार हे पारोळा येथील कुटीर रुग्णालयात अनुकंपा तत्त्वावर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नोकरीचा 'स्थायी' आदेश मिळावा, यासाठी त्यांनी आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. नियमानुसार मिळणारा हा आदेश देण्यासाठी सहायक अधिक्षक विजय वाघ याने तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. कष्टाचे पैसे लाच म्हणून देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २८ एप्रिल रोजी जळगाव एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी कुटीर रुग्णालय परिसरात सापळा रचला. यावेळी तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. वाघ याने जशी लाचेची रक्कम स्वीकारली, तसाच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यावर झडप घातली. भर रुग्णालयात झालेली ही कारवाई पाहून उपस्थित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आरोपीच्या अंगझडतीत ३३० रुपये रोख आणि एक विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकातील सुरेश पाटील, सुनील वानखेडे, बाळू मराठे यांनी ही यशस्वी कारवाई केली.