Sangli Bribe | पती शिक्षक पत्‍नी गावची सरपंच तरीही 35 हजाराचा मोह नडला! लाचलुचपतने दोघांनाही रंगेहात पकडले!

पेव्हिंग ब्लॉक बसवण्याची पोच पावती देण्यासाठी मागितली लाच, शिराळा तालुक्यातील वाकुर्डे गावातील घटना
Sangli Bribe
Sangli Bribe
Published on
Updated on

शिराळाः वाकुर्डे खुर्द(ता.शिराळा) येथील सरपंच आणि त्यांच्या शिक्षक पतीला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाची ताबा पावती देण्यासाठी आणि शासकीय कपाती जमा करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. सरपंच शितल बाळासाहेब पाटील (वय ४३), त्यांचे पती प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील जाधववाडी (माधळगाव) बाळासाहेब आकाराम पाटील (वय ५३) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.या दोघांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई सोमवार दि.६ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की,तक्रारदार यांना वाकुर्डे खुर्द येथे अनुसूचित जाती व जमाती नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचे अधिकार पत्र मिळाले होते. हे काम पूर्ण झाले असून, पुढील हप्ता मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीची 'ताबा पावती' आवश्यक होती. ही पावती देण्यासाठी आणि कामातील विमा, आयकर, जीएसटी यांसारख्या शासकीय कपाती शासनास जमा करण्यासाठी आरोपींनी मंजूर अनुदानाच्या ७ टक्के लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने यासंदर्भात ६ एप्रिल २०२६ रोजी सांगली एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपींनी प्रथम ५० हजार रुपये आणि तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. शिराळा तहसील कार्यालयासमोर असलेल्या 'हॉटेल दौलत'च्या पोर्चमध्ये सापळा रचण्यात आला होता. लाचेची रक्कम स्वीकारताच आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सांगलीच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे , योगेश चव्हाण, तसेच प्रितम चौगुले, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सागर नायकूडे, राजेश मुदगल, महेश शेंडगे, विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news