Nitesh Rane Chinchwad speech Pune
सिंधुदुर्ग

Nitesh Rane | सिंधुदुर्ग राज्यात नेहमीच प्रथम क्रमांकावर ठेवणार!

Nitesh Rane | नितेश राणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक गतीने पुढे नेत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नेहमीच प्रथम क्रमांकावर ठेवण्याचा निर्धार पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मान सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असून, त्याचबरोबर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक स्वावलंबी बनत असून, विकासाचा लाभशेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासाच्या प्रत्येक निर्देशांकात पुढे राहील आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत पालकमंत्री श्री. राणे यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधून ग्रामीण नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य होत आहे. विविध क्षेत्रांत जिल्हा परिषदेने शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवून शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करणे, वेळेत कामे पूर्ण करणे आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे यावर भर देण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक मानसिकतेने, लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठेवून काम केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास निश्चित साध्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.

आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी मानले. यावेळी लाड पागे समितीच्या शिफारशी नुसार १३ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल चावी वाटप, आयुष्मान कार्ड धारकांना कार्डाचे वाटप, वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन निधी वितरण, सेस अनुदानातून मागासवर्गीयांना शिलाई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय, घरकुलासाठी अर्थसहाय्य असे अनेक प्रकारचे सहाय्य देण्यात आले.

'एआय' मुळे प्रशासनाच्या कामकाजात गती, अचूकता आणि पारदर्शकता

सिंधुदुर्ग हा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणालीचा वापर करणारा पहिला जिल्हा आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेमार्फत ए. आय. चा प्रभावी वापर करण्यात येत असल्यामुळे कामकाजात गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढली असून, प्रत्यक्ष प्रगती स्पष्टपणे दिसून येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक बनविण्याचा जिल्ह्याचा प्रयत्न आहे. आज विविध योजनांचा लाभमिळालेल्या लाभार्थ्यांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशा यशकथांमुळे इतर नागरिकांनाही योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असून, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठी खर्च व्हावा

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत आहे. हा निधी शासनाचा नसून जनतेच्या हक्काचा आहे. त्यामुळे प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठी, पारदर्शक आणि प्रभावीपणे खर्च होणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना आणि निधीचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचा पुनरुच्चार राणे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT