

पणजी : पुढारी वृत्तसेवा
तंत्रज्ञान हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून आता आपण आपले दैनंदिन आयुष्य गॅजेट्स तंत्रज्ञान याशिवाय जगू शकत नाही. मात्र तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यातला दिशा दिली की आयुष्याची दशा केली, हे समजून घेणे काळाची गरज बनली आहे. आता तंत्रज्ञानाच्या भविष्यात प्रत्येकाला किमान ६ नोकऱ्या बदलाव्या लागतील, असे प्रतिपादन डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
२१ व्या जागतिक मराठी संमेलनात दिग्गजांनी चर्चासत्रातून तंत्रज्ञानाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. या चर्चासत्रात डॉ. रामराव वाघ, डॉ. मनोहर चासकर आणि प्रसाद शिरगावकर यांचा समावेश होता. डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, सध्या अगदी झपाट्याने बदलत असलेले क्षेत्र म्हणजे तंत्रज्ञानाचे क्षेत्र. कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्यानंतर आता सेवा क्षेत्रावर मोठे आणि भविष्यावर परिणाम करणारे बदल घडत आहेत.
एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने झेप घेतल्यानंतर सेवा क्षेत्रातील अनेक नोकऱ्या गेल्या. आत्ता नव्याने आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने तर सर्वत्र धुमाकूळ घातला असून आता किती नवीन गोष्टी अजून येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सांगताना प्रसाद शिरगावकर म्हणाले, आधी माणसाचे काम कमी करण्यासाठी यंत्रांचा वापर होऊ लागला. मात्र आता यंत्रणाच मानवी विचार करण्याचे कौशल्य विकसित झाल्याने माणसाच्या रोजच्या जगण्यात मोठा बदल घडला आहे.
या कृतिम बुद्धिमत्तेमागे मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कम्प्युटर व्हिजन, रोबोटिक्स, एक्स्पर्ट सिस्टीम आणि स्पीच रिकग्निशन अशा सर्व गोष्टी कार्यरत आहेत. या तंत्रज्ञान क्षेत्रात एआय आणि सायबर सुरक्षा या महत्त्वाच्या बाबी असून आता आपले आयुष्य तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे. त्यामुळे आपल्या माहितीचे खाजगीकरण ठेवण्यासाठी आवश्यक पावले आणि सामाजिक जागृतीची गरज आहे.
एआय मुळे शिक्षण क्षेत्रातही मोठे नकारात्मक परिणाम झाले असून विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कमी करू लागले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी नक्कीच होऊ शकतो, मात्र अमर्यादित वापर केल्यास त्याचे तोटे होण्याची जास्त संभावना आहे, असे मत रामराव वाघ यांनी व्यक्त केले. मनोहर चासकर पुढे म्हणाले की, शिक्षण साहित्य कलाक्षेत्रात याने आपली पाळेमुळे रुजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एआयला दिलेल्या प्रॉम्प्टनुसार तुम्ही अख्खी कादंबरी लिहू शकता, अभ्यासाची गणिते सोडवू शकता. जर भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बळी व्हायचे नसेल तर त्याची तोंड ओळख करून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण इथून पुढे ज्यांना एआय येते त्यांचाच निभाव लागू शकतो.
विविध पैलूंबाबत बोलताना शिरगावकर म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण आता केवळ डेटा (माहिती) म्हणून उरलो आहोत. आपल्या या डेटाला वेगवेगळ्या अल्गोरिथमच्या माध्यमातून दिशा दिली जात आहे. त्यावरून आपल्या आवडीनिवडींनाही दिशा दिली जात आहे. ह्या सगळ्याची जाणीव ठेवून कोणतेही तंत्रज्ञान आणि आपल्या हातातील मोबाईल वापरताना सजग असणे काळाची गरज बनली आहे.
एआय तंत्रज्ञानाची माणसांना भीती का?
एआय तंत्रज्ञान माणसाच्या बुद्धिमत्तेवर मात करेल याची मानवाला भीती नाही, मात्र आपला बुद्धिमत्तेवर ते नक्कीच परिणाम करेल, याची भीती असल्याने पर्यायी नोकरी जाण्याची भीती आणि शक्यता निर्माण झाली आहे. कारण आपल्या बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत पण एआयला नाही, असे मत शिरगावकर यांनी व्यक्त केले.