दोडामार्ग : तिलारी मुख्य वसाहतीच्या पुलाजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत कार आढळून आली आणि एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या कारची नंबरप्लेट नसल्याने संशय अधिकच बळावला. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असला तरी, हा घातपात आहे की अपघात? याबाबत मात्र अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
तिलारी धरणाच्या पाण्याचा विसर्ग पुच्छ कालव्याद्वारे केला जातो. या कालव्यावर मुख्य वसाहतीजवळ एक पूल बांधला गेला आहे. या पुलाजवळ अनेक ग्रामस्थ सकाळ, सायंकाळच्या सुमारास टेहळणीसाठी येत असतात. गुरूवारी सकाळी टेहळणीसाठी आलेल्या काही ग्रामस्थांना या पुलानजीक कार आढळून आली. कार कोणाची असावी हे जवळून पाहण्यासाठी गेले असता आत मध्ये रक्ताचे शिंतोडे पडलेले त्यांना दिसले. हे पाहताच ग्रामस्थ घाबरले व तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी कारमध्ये रक्त पडलेले त्यांना दिसले, मात्र गाडीत कोणतीही व्यक्ती दिसून आली नाही. विशेष म्हणजे या कारची नंबरप्लेट नसल्याने ती कोणाची असावी, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे तिलारी परिसरासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. शिवाय अनेक तर्कवितर्क लावू लागले. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संपूर्ण प्रकाराचा पोलीस यंत्रणेने त्वरित उलगडा करावा अशी मागणी जोर धरत आहे.
घातपाताचा संशय!
ज्या ठिकाणी कार सापडली, तेथे ती कशी गेली असावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीजण अपघात तर काहीजण घातपाताचा संशय व्यक्त करत होते. हा अपघाताचा प्रकार वाटत असला तरी कारची स्थिती, नंबर प्लेट गायब असणे आणि रक्ताचे प्रमाण पाहता घातपाताचाही संशय अधिकच गडद झाला आहे.
कारचा नंबर मिळाल्यास गूढ उकलणार!
घटनेबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांना विचारले असता ते म्हणाले, प्राथमिक अंदाजानुसार कार मधील रक्त मनुष्याचे असावे. तसेच कारचा चेसिस व इंजिन नंबर आरटीओ विभागाकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून कारचा नंबर व मालकाची संपूर्ण माहिती प्राप्त होताच या घटनेचे गूढ उकलण्यास सोपे होणार आहे.
वीजघर येथे पोलिसांचा तपासणी नाका आहे. तसेच गोव्यातून दोडामार्गात येणारे अनेक रस्ते आहेत. त्यामुळे ती कार नेमकी कोणत्या दिशेने आली असावी? ती कार स्थानिकाची आहे की गोवा किंवा इतर राज्यातील आहे? जर घातपात झाला तर ती त्याठिकाणी पोहोचलीच कशी असावी? आणि जर अपघात असेल तर अपघातग्रस्त व्यक्ती कोठे असावेत? असे नानाविध सवाल उपस्थित होत आहेत.