कुडाळ : फ्लाय 91 आणि सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ प्रशासनाने संयुक्तपणे सुरू केलेली चिपी विमानतळ ते पणजी (गोवा) दरम्यानची नि:शुल्क कोच सेवा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे. ही कोच सेवा फ्लाय 91 ची टियर 2 आणि टियर 3 शहरांना जोडण्याची कटिबद्धता दर्शविते. ही नि:शुल्क कोच सेवा प्रवाशांच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरत आहे. ही सेवा छोट्या विमानतळांना प्रमुख शहरी केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडत आहे, अशी माहिती फ्लाय 91 विमान कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, या सेवेमुळे चिपी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना गोव्याच्या मुख्य शहरापर्यंत पोहोचण्यासाठी सहज, सोयीस्कर आणि खर्चिक त्रासाशिवाय प्रवास करता येतो.
आरामदायी वातानुकूलित बस, ठराविक वेळापत्रक, आणि प्रवाशांच्या गरजांचा विचार करून आखलेला मार्ग यामुळे या सेवेची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. स्थानिक नागरिकांपासून ते पर्यटकांपर्यंत अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, कोकणातील हवाई सेवा अधिक प्रभावी आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.