सिंधुदुर्ग विमानतळावर आता रात्रीही विमान उतरणार!  File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Airport : सिंधुदुर्ग विमानतळावर आता रात्रीही विमान उतरणार!

डीजीसीएकडून ‌‘ऑल वेदर‌’ मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (ऊॠउअ) यांनी सिंधुदुर्ग विमानतळाला ‌‘ऑल वेदर ऑपरेशन्स‌’श्रेणीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता रात्री तसेच प्रतिकूल हवामानातही सिंधुदुर्ग विमानतळावर विमान उतरणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता अनेक एअरलाईन्स कंपन्या आपली विमाने या विमानतळावर उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डीजीसीएकडून देण्यात आलेल्या या मंजुरीत विमानतळावरील अत्यावश्यक पायाभूत सुविधांची यशस्वी तपासणी करण्यात आली. यामध्ये रनवे स्ट्रिप, एरोनॉटिकल ग्राऊंड लाईटिंग सिस्टीम तसेच रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मन्स आधारित इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रणाली यांचा समावेश आहे. या प्रणाली कार्यान्वित झाल्याने ढगाळ हवामान, पाऊस तसेच रात्रीच्या वेळी वैमानिकांना उपकरणांच्या आधारे सुरक्षित लँडिंग करता येणार आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग विमानतळावर केवळ दृश्यतेवर आधारित उड्डाणे होत होती. मात्र आता तांत्रिकदृष्ट्या विमानतळ अधिक सक्षम बनला आहे. दरम्यान, प्रत्यक्ष रात्रीची विमानसेवा सुरू होण्यासाठी संबंधित एअरलाईन्सचे वेळापत्रक, एअर ट्रॅफिक कंट्रोल सेवा आणि अंतिम ऑपरेशनल प्रक्रिया लागू होणे आवश्यक आहे. तरीही या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून पर्यटन, व्यापार आणि आपत्कालीन सेवांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

पाच वर्षांपूर्वी या विमानतळाचे उद्घाटन झाले. तिथपासून केवळ दिवसा विमाने उतरत होती आणि टेकऑफ घेत होती. या विमानतळाची क्षमता जास्त असतानाही त्यामुळे फारशी विमाने उतरत नव्हती. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याठिकाणी वीजपुरवठा अद्ययावत करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला होता. त्यातून हे काम आता पूर्ण झाले असून संपूर्ण विद्युत यंत्रणा बसवल्यामुळे रात्रीचे विमान उतरवणे शक्य झाले आहे. त्याशिवाय ढगाळ वातावरणातही विमान उतरवता येणार आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे वारंवार विमाने रद्द केली जात होती. आता ती अडचण येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT