

वैभववाडी ः दरवर्षी होणार्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावाची गावपळण बुधवारी दुपारनंतर सुरू झाली आहे. ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळेवाशीयांनी आपली गुरेढोरे, कोंबड्या, कुत्रे यांच्यासह गाव सोडत सडूरे गावच्या हद्दीत, दडोबा डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक अधिवासात उभारलेल्या राहुट्यांत आपला संसार थाटला आहे.
वैभववाडीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसुली गाव असून येथे मराठा व धनगर समाजाची सुमारे 80 कुटुंबे आणि 350 लोकसंख्या आहे. षौष महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी होणारी ही गावपळण सुमारे 450 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असल्याची माहिती गावातील जाणकार वयोवृद्धांनी दिली.
सडूरे गावच्या माळरानावर तब्बल 40 राहुट्या उभारण्यात आल्या असून प्रत्येक राहुट्यांसमोर गुरांसाठी गाताड्या बांधण्यात आल्या आहेत. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसह आबालवृद्ध, कडक्याच्या थंडीतही या गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले आहेत. गावपळणी दिवशी घरातून बाहेर पडलेला दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहिले तीन दिवस कोणताही ग्रामस्थ गावाकडे फिरकत नाही. या काळात गावची प्राथमिक शाळा राहुट्यांजवळील आंब्याच्या झाडाखाली भरते, तर एस.टी. बस थांबाही तिथेच असतो. पिण्यासाठी लगतच्या शुकनदी पात्रातील झर्याचे पाणी वापरले जाते.
आजच्या धावपळीच्या युगात शहराकडे धावणार्या माणसाचे निसर्गाशी असलेले नाते तुटत असताना, शिराळे गावची गावपळण माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते घट्ट करणारी परंपरा ठरत आहे. मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून ग्रामस्थ दिवसभर गप्पागोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात, तर रात्री भजनाच्या माध्यमातून आनंद साजरा करतात.
परतीच्या दिवशी ‘घोरपी’ उत्सव
तीन दिवसांनंतर पुन्हा ग्रामदैवत गांगेश्वराला कौल लावण्यात येणार असून, देवाचा हुकूम मिळाल्यानंतर पाच किंवा सात दिवसांनी ग्रामस्थ परत गावात दाखल होतील. गावात परतण्याच्या दिवशी रात्री ‘घोरपी’ हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी नातेवाईक व मित्रपरिवार आवर्जून उपस्थित राहतात आणि सर्वांना महाप्रसाद दिला जातो.