नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
Dr Sharyu Asolkar Passes Away: मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मधल्या कठड्यावर कार आदळून भिषण अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रतील ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक आणि कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय मराठी विषयाच्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (दि. १६ नोव्हेंबर) सकाळी 7.30 च्या सुमारास नांदगाव येथे घडला.
इनोव्हा गाडी घेऊन वैभव कृष्णा असोलकर (वय 46 वर्षे) आणि त्यांची बहीण शरयू कृष्णा असोलकर (वय 59 वर्षे) दोघे रत्नागिरी ते सावंतवाडी असे मुबंई गोवा हायवे रोडने प्रवास करत होते. यावेळी मौजे नांदगाव येथील ओटव फाटा येथे सकाळी 07.30 वाजता आले असता ओव्हरब्रीज गोडवरील त्यांची गाडी कठड्याला धडकली. या अपघातात शरयू आसोलकर या गंभीर जखमी झाल्या. वैभव यांना देखील दुखापत झाली होती.
अपघाताचा आवाज येताच आजुबाजूच्या ग्रामस्थांनी तसेच जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांनी मदतीसाठी धाव घेतली तसेच रुग्णवाहिकांना बोलविण्यात आली. रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी शरयू यांना कणकवली येथे हलविण्यात आले परंतु त्यांचे कणकवली रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जखमी असलेला त्यांचाच भाऊ वैभव कृष्णा आसोलकर यांना नांदगाव केंद्राच्या रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यातून चंद्रकांत झोरे यांनी अपघातस्थळी येत पंचानामा केला.
नांदगाव ओटव फाटा या स्पॉटला अपघातातांची मालीका सुरुच असून दुभाजकातील मधल्या कठड्यावर गाडी आदळून आढळून अपघात झाले आहेत. व हकनाक बळी जात आहेत.