सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सायबर फ्रॉडच्या माध्यमातून 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांला 97 लाख रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने गंडा घालत लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातावर आय टी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वेळीच पाऊले उचलल्यामुळे सुमारे 9 लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर होण्यापासून रोखण्यात यश आले आहे.
एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात सायबर गुन्हेगाराने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांचे तब्बल 97 लाख रुपये ऑनलाइन फसवणूक द्वारे ट्रान्सफर करून घेतले.
पीडित हे 85 वर्षीय ज्येष्ट नागरिक असून 26 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करत त्यांना तुमच्या बँक खात्यातून 25 लाख रुपयांचा व्यवहार झाला असून, आपण मनी लॉन्ड्रींग प्रकरणात संशयित आहात. यासंबंधी चौकशीसाठी आपणास तत्काळ मुंबई क्राईम ब्रँच येथे हजर राहावे लागेल असे सांगितले.
ज्येष्ठ नागरिक मुंबईला प्रत्यक्ष येण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यावर, आरोपीने त्यांना ऑनलाइन चौकशीला सामोरे जा असे सांगून जाळ्यात ओढले. यानंतर, विविध क्लृप्त्या वापरून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातील मुदत ठेव, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवलेली रक्कम असे 97 लाख रुपये आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.
दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने करत आहेत. या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात पोलिसांनी तत्काळ हालचाली केल्याने सिंधुदुर्ग सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने अवघ्या 3 ते 4 तासांत समारे 9 लाख रुपये होल्ड करण्यात यश मिळवले आहे.