

कणकवली: कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वागदे एसटी थांब्याजवळ संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बोलेरो पिकअप गाडीमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या 1,800 बाटल्यांचे 150 बॉक्स आढळून आले. त्याची किंमत 7 लाख 20 हजार रुपये असून, गाडीसह 16 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीच्या पथकाने शनिवारी केली. याप्रकरणी गुजरात राज्यातील दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मुंबई विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली एक्साईजचे निरीक्षक नितीन शिंदे, सहा. दुय्यक निरीक्षक रमाकांत ठाकूर, जवान अजित गावडे, तुषार ठेंबे, वाहनचालक
हेमंत वस्त यांनी ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्कचे पथक महामार्गावर वागदे एसटी थांब्याजवळ वाहनांची तपासणी करत होते. या दरम्यान तेथे आलेली बोलेरो पिकअप गाडी या पथकाने तपासणीसाठी थांबवली. तपासणीत या गाडीच्या हौद्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याच्या 750 मिलीच्या 1800 बाटल्या कागदी पुठ्ठ्याचे एकुण 150 बॉक्स मध्ये मिळून आल्या. पथकाने या दारूसह वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप जप्त केली.
याप्रकरणी संशयित दिनेशभाई रतनभाई बावलीया, भावेशभाई हर्जीभाई वाडेर (दोन्ही रा. गुजरात) यांच्यावर गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली. 7 लाख 20 हजारांची दारू आणि 9 लाख 50 हजारांची बोलेरो गाडी असा मिळून 16 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तपास एक्साईजचे निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.