सावंतवाडी : सावंतवाडी शहरात वादळी वार्यासह झालेल्या पावसाने कॉलेज रोड ते कंटक पाणंदीकडे जाणार्या मार्गावरील एका खासगी इमारतीच्या पाण्याच्या टाकीची पत्र्याची शेड लोखंडी बारसह रस्त्याकडेच्या नाबर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये पडली. सुदैवाने या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी हानी झाली नाही. शनिवारी सायंकाळी 5. 45 वा. च्या सुमारास ही घटना घडली. हा मार्ग रहदारीचा असून रस्त्यावर शेड कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
सदर इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर ही शेड उभारण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू होता. त्याचवेळी मोठा आवाज झाला. नागरिकांनी पाहण्यासाठी धाव घेतली तेव्हा भलीमोठी शेड कोसळल्याचे ध्यानी आले. या रस्त्यावरून सायंकाळी रहदारी सुरू असते. तसेच वाहनेही जात असतात. ही शेड अशावेळी रस्त्यावर कोसळली असती तर मोठ्या मनुष्यहानीची शक्यता होती.
सुदैवानेच शेड बाजूला कोसळली. ही शेड उज्ज्वला उमाकांत नाबर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये कोसळली. सुदैवानेच त्यावेळी कंपाऊंडमध्ये कुणी नव्हते. मात्र, यामुळे त्यांच्या बागेतील झाडांची हानी झाली. या घटनेमुळे नाबर कुटुंबीय भीतीच्या छायेखाली असून अशा शेडबाबत नगरपालिकेने संबंधित इमारतीच्या मालकाला सूचना द्याव्यात. तसेच धोकादायक शेडची पाहणी केली जावी, अशी मागणी केली आहे.