मळगाव : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा गेले कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार नोंदविण्याच्या मोहिमेतून लक्ष वेधून घेण्याची मोहीम सावंतवाडी टर्मिनस संघर्ष समितीने सुरू केली आहे.
सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्याची गेले कित्येक दिवसांची मागणी प्रलंबित आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. मात्र, या मागणीची अजूनही रेल्वे मंत्रालयाने दखल घेतलेली नाही. सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशन वरून प्रवास करणार्या प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे संघर्ष समिती, प्रवासी संघटना व नागरिकांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली.
आंदोलने व उपोषण करण्यात आले. त्याचीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. सहाजिकच सावंतवाडी रेल्वे स्टेशन वरून प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस संघर्ष समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार नोंदणी मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार तक्रार नोंदविण्याची मोहीम सुरू झाली आहे. कोकण रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सव कालावधी 22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत मुंबईकर चाकरमानी गणेश भक्तांसाठी ज्यादा गाड्या सोडून उत्तम नियोजन केले होते. परंतु मुंबईप्रमाणे पुण्यासारख्या मोठ्या शहराकडून कोकणासाठी एकही विशेष गाडी सोडण्यात आली नाही.
कोकण रेल्वे मार्गावरून जाणार्या लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्या सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला थांबत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रवास करताना गैरसोय होते. तसेच दररोज सुटणार्या काही ठरावीक गाड्यावरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागते.
जर सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला टर्मिनल झाले तर सर्व गाड्या थांबून येथील प्रवाशांची गैरसोय दूर होईल. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर गर्दीच्या वेळी असलेल्या फलाटांवर प्रवाशांसाठी निवारा शेडची आवश्यकता आहे. गणेशोत्सव कालावधी पाऊस सुरू होता, अशावेळी फलटावर निवारा शेडची सोय नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोय सामोरे जावे लागले. पण, या बाबीकडे अद्यापपर्यंत प्रशासन लक्ष देत नाही.
सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन टर्मिनलसाठी संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संघर्ष समिती व नागरिकांच्या माध्यमातून ई-मेलद्वारे तक्रार नोंदवल्यावर एक विशिष्ट क्रमांकाचा कोड मिळेल. तो संघर्ष समितीच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर शेअर करून कोकणवासीयाने सहभाग घेऊन सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस प्रश्न मार्गी लागण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.