सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर व शिरोडा नाका परिसरातील तीन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली; मात्र त्यांच्या हाती फारसे काहीही लागले नाही; पण शहरातील तीन फ्लॅट एकाच रात्री फोडल्याने शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
सर्वोदय नगर -शिक्षक कॉलनी येथे गवस यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला; मात्र गवस यांनी घरात किमती सामान किंवा पैसे न ठेवल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत फ्लॅटमधून कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे समोर आले आहे; मात्र चोरट्यांनी अन्य ठिकाणीही हात साफ केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे, सर्वोदयनगर परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात तोंडाला रुमाल बांधलेले दोन संशयित चोरटे कैद झाले आहेत.
शिक्षक कॉलनी येथील गवस कुटुंबीय गणेश चतुर्थीसाठी चौकुळ येथे गावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. आज सकाळी शेजार्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता दरवाजा उघडा असल्याचे आढळले.
याबरोबरच शिरोडा नाका परिसरातील दोन बंद फ्लॅटही चोरट्यांनी अशाच प्रकारे फोडल्याचे उघडकीस आले. या फ्लॅटमधूनही चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. चोरट्यांची ही टोळी एकच असावी. त्यांनी सावंतवाडी शहर व लगतच्या परिसरात आणखी काही बंद घरे, फ्लॅट फोडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.