पर्णकुटी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते Pudhari
सिंधुदुर्ग

Sawantwadi News | नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांच्या वादात सावंतवाडीचा विकास ठप्प; २८ कोटींच्या कामांची चौकशी करा : संजू परब

नगरपरिषदेतील २८ कोटींच्या कामांची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Sanju Parab

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील अंतर्गत वादामुळे शहराच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी वैयक्तिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनतेला वेठीस धरणे थांबवावे. तसेच नगरपरिषदेतील २८ कोटी रुपयांच्या कामांची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

पर्णकुटी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

नगरपरिषदेतील विशेष सभेत थर्ड पार्टी ऑडिटचा अहवाल समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले होते. या सभेला उपनगराध्यक्ष ऑनलाइन उपस्थित होते. अहवालाबाबत आक्षेप असल्यास तो त्याचवेळी का नोंदवला नाही, असा सवाल परब यांनी उपस्थित केला. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांमध्ये समन्वय नसल्याने कारभारावर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले.

शहराच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम राजकीय वादामुळे थांबता कामा नये. काम रखडल्यास खर्च वाढण्याबरोबरच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

नगरपरिषदेतील २८ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत का, याची मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्टता द्यावी. कामे अपूर्ण असतानाही ठेकेदारांची बिले अदा केली असल्यास त्याची चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी परब यांनी केली.

मोती तलावाच्या संरक्षणासाठी समिती

सावंतवाडीच्या मोती तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचा मुद्दाही परब यांनी उपस्थित केला. केवळ दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याचे सांगत त्यांनी तलावाच्या संवर्धनासाठी मोती तलाव बचाव समिती स्थापन करण्याची घोषणा केली. तलावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT