

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील मच्छीमारांना इतर कोणत्याही राज्यावर अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे प्रमुख ध्येय आहे. याच उद्देशाने वेंगुर्ला येथे पुढील १२ महिन्यांत देशातील पहिले ‘बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र’ उभारण्यात येत आहे, अशी घोषणा मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली.
मंत्री राणे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या भागातील माशांना मोठी मागणी आणि किंमत आहे. मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खात्याच्या बजेटचा आढावा घेतला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये ३० टक्के वाढ दिली. यापूर्वी राज्याची स्वतःची एकही स्वतंत्र योजना नव्हती, आपण केवळ ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’वर अवलंबून होतो. ‘फयान’ वादळा वेळी मच्छीमारांना मदत करण्यासाठी कोणतेही स्पष्ट निकष नव्हते. हीच अडचण दूर करण्यासाठी आम्ही मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला. मत्स्य विभागाचे बजेट आज १२४० कोटींवर पोहोचले असून २०२९ पर्यंत ते ५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. नाबार्डने या व्यवसायासाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.