वेंगुर्ले : आपण पोलिस असल्याचे सांगून वृद्ध व महिला पादचार्यांना लुटणार्या टोळीतील आणखी एका संशयित इराणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने सांगली येथून ताब्यात घेतला. उनमत युसुफ इराणी (वय 32) असे त्याचे नाव आहे.
4 ऑगस्ट 2025 रोजी वेंगुर्ला आणि सावंतवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. या संशयितांनी आपण पोलिस आहोत. पुढे तपासणी सुरू आहे.तरी तुमच्या अंगावरील दागिने माझ्याकडे द्या, असे एकट्या- दुकट्या पादचारी वृद्धांना सांगत त्यांच्याकडून दागिणे घेत ते पुन्हा कागदाच्या पुडीत बांधून दिल्याचे भासवत. पण प्रत्यक्षात हातचलाखी करत दागिण्यां ऐवजी दगडगोटे बांधलेली पुडी या वृद्धांच्या हाती देऊन, त्यांचे दागिणे लुबाडून पोबारा केला होता.
या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अबू तालीम मुसा इराणी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने सांगली येथून अटक केली होती. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी याच गुन्ह्यामध्ये आणखी एक आरोपी सांगली येथील उनमत युसुफ इराणी याला पथकाने सांगली रेल्वे स्टेशन जवळ, इराणी वस्ती येथून शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही करिता त्याला वेंगुलेर्र् पोलिस स्टेशनच्या ताब्यात सायंकाळी देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक अनिल हाडळ, हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस व कॉन्स्टेबल अमर कांडर यांनी केली.