वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सडूरे दौंडोबा येथे दरड कोसळली. ही दरड एसटी बस त्याठिकाणी येता येताच कोसळली. मात्र संभाव्य दुर्घटनेतून शिराळे- विजयदुर्ग ही वस्तीची एसटीची बस थोडक्यात बचावली. सोमवारी सकाळी 6.30 वा. च्या सुमारास ही घटना घडली.त्यामुळे सुमारे पाच तास वाहतूक बंद होती. दुपारी जेसीबीच्या मदतीने दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.
तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने वैभववाडी-सडूरे शिराळे मार्गावर सडूरे येथे रस्त्यावर सकाळी मोठी दरड कोसळली. या दरम्यान त्याठिकाणी शिराळे येथून वस्तीची एस टी बस वैभववाडीकडे येत होती. एसटी बस वर दरड कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. अन्यथा मोठा अपघात घडला असता. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र दरडीचा मोठा भागाच रस्त्यावर आल्यामुळे पूर्णपणे मार्ग ठप्प झाला.
एसटी चालकांने बस मागे घेत सुरक्षित ठिकाणी उभी केली. याबाबत बांधकाम विभागाला माहिती मिळताच नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडळ अधिकारी श्री. ठाकूर, बांधकामचे अभियंता श्री. बाबर, श्री. इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी बोलावून दुपारी 12.45 वा. च्या सुमारास पूर्णपणे दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर अडकून पडलेली शिराळे -विजयदुर्ग एसटी बस वैभववाडीच्या दिशेने मार्गस्त झाली. सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत जाधव, सुनील राऊत, अशोक पाटील आदी उपस्थित होते.